‘पीओपी’वरील बंदीमुळे महाराष्ट्रातील जवळपास ८० टक्के मूर्तीशाळांमध्ये काम ठप्प !

  • ३ महिन्यांत लाखो शाडूच्या मूर्ती घडवण्याचे कारागिरांपुढे आव्हान !

  • सार्वजनिक मंडळांचा कल ‘फायबर’कडे !

(पीओपी म्हणजे प्लास्टर ऑफ पॅरिस)

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – काही वर्षांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने घातलेल्या ‘पीओपी’वरील बंदीविषयी यंदा पुणे महापालिकेने काटेकोर कार्यवाही करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. महापालिकेच्या प्रशासनाने मोहीम तीव्र केल्याने राज्यातील ८० टक्के मूर्तीशाळांमध्ये गणेशमूर्ती घडवण्याचे काम ठप्प झाले आहे. पुण्यातील मूर्तीशाळांमध्ये ८० टक्के मूर्ती या ‘पीओपी’, तर २० टक्के मूर्ती या शाडूच्या मातीपासून घडवण्यात येतात. शाडूच्या मूर्तीचे काम आतापासून चालू केल्यास त्यास केवळ ३ महिने अवधी मिळणार आहे. मूर्तीकारांना मूर्ती सिद्ध झाल्यानंतर त्याची रंगरंगोटी करावी लागते, त्याला अवधी द्यावा लागतो. रंग न दिलेली मूर्ती मूर्ती पावसाळ्यात ओल पकडून भंगण्याची शक्यता असते. सध्या पुण्यात गणेशमूर्तींची वाढती मागणी लक्षात घेता अपुर्‍या मनुष्यबळात ‘शाडूमातीच्या मूर्ती घडवायच्या कशा ?’, हा प्रश्न आहे.

सार्वजनिक मंडळांचा कल ‘फायबर’कडे

मुंबई उच्च न्यायालयाने गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळे प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या आहेत. त्या अनुषंगाने बहुतांश मंडळांचा कल ‘फायबर’च्या मूर्ती करवून घेण्याकडे आहे. (सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती या उंचीने मोठ्या असतात. शाडूमातीपासून मोठी मूर्ती बनवू शकत नाही. प्रशासनाने प्रथम छोटी मूर्ती बनवण्याच्या दृष्टीने मर्यादा घालणे आवश्यक होते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • ‘पीओपी’ने पाण्याचे प्रदूषण होत नाही, असा अहवाल ‘सृष्टी इको रिसर्च’ संस्थेने दिला आहे. ‘पीओपी’ नको असेल, तर प्रशासनाने पीओपी बंदीपूर्वी शाडू मातीसारखे पर्याय मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले असते, तर आज ही बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती !
  • पर्याप्त पर्याय उपलब्ध करून न देता ‘पीओपी’वर बंदी घातल्याने उद्भवणार्‍या स्थितीची प्रशासनाला कल्पना नाही का ? असे करणे म्हणजे बहुसंख्य जनतेला धर्माचरणापासून दूर ठेवण्यासारखेच नव्हे का ?
  • शाडू, चिकणमाती किंवा प्लास्टर ऑफ पॅरिस यांपेक्षा फायबरच्या मूर्ती प्रदूषणकारी आहेत. या प्रदूषणाला उत्तरदायी कोण ?