५०० कोटी रुपयांच्या कारागृह घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी समितीच्या वतीने अन्वेषण करावे !

माजी खासदार राजू शेट्टी यांची पत्रकार परिषदेत मागणी

पुणे – राज्यातील कारागृहात वर्ष २०२३-२४ मध्ये रेशन, कँटीन आणि विद्युत् उपकरण खरेदीमध्ये ५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा घोटाळा झाला आहे. या घोटाळ्यात राज्यातील मोठ्या अधिकार्‍यांचा सहभाग असल्याने तत्कालीन अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता, पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली.

शेट्टी म्हणाले की, मंत्रालयीन वितरण उपाहारगृहामध्ये खरेदी करण्यात आलेले साहित्य आणि कारागृहासाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य यातील किंमतीमध्ये मोठी तफावत आहे. राज्यातील अनेक कारागृहांत अन्न भेसळ विभागाने धाडी घातल्या. यामध्ये शिधा आणि उपाहारगृहातील निकृष्ट दर्जाच्या मालाचे नमुने अहवाल सादर केले. तरीही ठेकेदारांकडून कोणतीही सुधारणा केली गेली नाही. याविषयी कारागृह अपर पोलीस महासंचालकाकडे तक्रार प्रविष्ट करूनही कोणतीच कारवाई झालेली नाही. (ही स्थिती गंभीर आहे. संबंधितांवरही कारवाई होणे आवश्यक आहे ! – संपादक)