पणजी, ११ एप्रिल (वार्ता.) – राज्यात १ जानेवारी २०१५ ते ३१ डिसेंबर २०२४ या मागील १० वर्षांच्या कालावधीत २५ सहस्र ७६२ गोमंतकियांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आहे. आकडेवारीनुसार वर्षाला सरासरी २ सहस्र ५००, म्हणजे प्रतिदिन ६-७ गोमंतकीय भारतीय नागरिकत्वाचा त्याग करत आहेत. मागील ४ वर्षांमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
गोवा राज्य १९ डिसेंबर १९६१ मध्ये पोर्तुगिजांच्या जोखडातून मुक्त झाले. त्यापूर्वी जन्मलेल्या अनेक गोमंतकीय नागरिकांची पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी झालेली आहे. अशा नागरिकांना किंवा त्यांच्या पाल्यांना काही अटींवर पोर्तुगालचे नागरिकत्व मिळू शकते. पोेर्तुगालचे नागरिकत्व मिळाल्यानंतर युरोप संघात प्रवेश करता येतो आणि तेथे चांगली नोकरी, आर्थिक सुविधा, चांगले जीवनमान आणि सर्वच दृष्टीकोनातून सुरक्षित जीवन जगता येते. या भावनेमुळे अनेक गोमंतकीय भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून पोर्तुगीज नागरिकत्व स्वीकारून इतर देशांत स्थायिक होत आहेत. याखेरीज अनेक जण कॅनडा, अमेरिका, रशिया, पोलंड, जर्मनी आणि जपान या देशांसह इतर देशांचे नागरिकत्व घेत आहेत. वषर्र् २०१५ मध्ये ३ सहस्र ९४०, वर्ष २०१६ मध्ये ४ सहस्र १२१, वर्ष २०१७ मध्ये ३ सहस्र ६२३, वर्ष २०१८ मध्ये ३ सहस्र ५१६, वर्ष २०१९ मध्ये २ सहस्र ९५८, वर्ष २०२० मध्ये ९७६, वर्ष २०२१ मध्ये ९५४, वर्ष २०२२ मध्ये १ सहस्र २८५, वर्ष २०२३ मध्ये २ सहस्र ९४ आणि वर्ष २०२४ मध्ये २ सहस्र २९५ गोमंतकीय नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग करून इतर देशांचे नागरिकत्व स्वीकारले आहे.