‘महापर्यटन उत्सवा’पूर्वी महाबळेश्वर येथील विकासकामे मार्गी लावा ! – श्री. संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचे निर्देश

सातारा, ११ एप्रिल (वार्ता.) – महाबळेश्वर येथे ‘महापर्यटन उत्सव २०२५’चे आयोजन केले आहे. २ ते ४ मे या कालावधीत राज्यभरातून पर्यटक या उत्सवाला येणार आहेत. त्यामुळे कोणत्याही पर्यटकाची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी शहरामध्ये चालू असलेली सुशोभीकरणाची विविध विकासकामे मार्गी लावून महापर्यटन उत्सव यशस्वी होण्यासाठी सर्वांनी समन्वयातून कार्य करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.

महाबळेश्वर येथील वन विभागाच्या ‘हिरडा’ विश्रामगृहामध्ये आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. या वेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील पुढे म्हणाले की, उत्सव काळात पर्यटकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची दक्षता पोलीस विभागाने घ्यावी. महाबळेश्वरला येण्यासाठी वाई, सातारा, कोकणातून रस्ते आहेत. या रस्त्यांची कामे आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करावीत, तसेच अधिकाधिक पर्यटक हे उत्सवाला येण्यासाठी विविध माध्यमांचा उपयोग करून प्रसिद्धी द्यावी. या उत्सवामध्ये स्थानिक व्यावसायिकांचाही सहभाग घ्यावा. ज्या ठिकाणी वाहनतळ व्यवस्था करणार आहोत, त्या ठिकाणाहून पर्यटकांना उत्सवाच्या ठिकाणी येण्यासाठी बसगाड्यांची पर्यायी उपलब्धता करून देण्यात यावी. पर्यटकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य आराखडा सिद्ध करण्यात यावा.