कोल्हापूर – शिरोळ येथे स्वत:च्या पत्नीला फसवून आणखी २ विवाह करणारा शिरोळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक इम्रान बाबाजी मुल्ला यांना सेवेतून निलंबित करण्यात आलो आहे. मुल्ला यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने तक्रार प्रविष्ट केल्यावर कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाने ही कारवाई केली आहे.
पोलीस उपनिरीक्षक मुल्ला यांचा वर्ष २०१९ मध्ये विवाह झाला. त्या वेळी गोंदिया येथे सेवा बजावत असतांना त्यांचा त्यांच्या पत्नीशी सातत्याने वाद होत असे. त्या वेळी त्यांच्या पत्नीने गोंदिया पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन निलंबनाची कारवाईही झाली होती. यानंतर २३ जून २०२४ ला इम्रान मुल्ला यांच्या विरोधात त्यांच्या पत्नीने कराड पोलीस ठाण्यात ३ विवाह केल्याची तक्रार दिली होती. (पत्नीने तक्रार दिल्यानंतरही इम्रान यांच्यावर कारवाई न करणार्या संबंधित पोलीस अधिकार्यावरही गृह विभागाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक) त्यावर कारवाई न झाल्याने त्यांनी माहिती अधिकारात आवेदन देऊन प्रशासनाकडे पाठपुरावा केला. यानंतर त्यांनी ३ वेळा विवाह केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलीस प्रशासनाने पुढील कारवाई केली !