बारामती येथे महिलेवर सामूहिक अत्याचार करून लाखो रुपये उकळले !

पीडितेला एका व्यक्तीच्या हत्येच्या कटात सहभागी केले

बारामती (जिल्हा पुणे) – तालुक्यातील एका महिलेशी ओळख करून ओळखीतून बळजोरीने शारीरिक संबंध निर्माण केले. त्याची चित्रफित आणि छायाचित्रे काढून तिच्याकडून १४ लाख रुपयांची खंडणी घेतली. तिला बळजोरीने सहभागी करून एका सामाजिक कार्यकर्त्याच्या हत्येचा कट आखण्यात आला. या हत्येमध्ये सहभागी न होता पीडित महिलेने बारामती पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली. त्यावरून गणेश पवार, अनिल गुणवरे, महेंद्र खैरे आणि एक अनोळखी यू ट्यूबर पत्रकार (यू ट्यूबर म्हणजे यू ट्यूब या सामाजिक माध्यमावर व्हिडिओ सिद्ध करून प्रसारित करणारा) यांच्यासह ६ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना सप्टेंबर २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत घडली आहे.

१. पीडित महिला मुलाच्या शिक्षणाच्या निमित्ताने माळेगावमध्ये रहाते. ती एका व्यायामशाळेत जात असतांना आरोपी गणेश पवार याच्याशी ओळख निर्माण झाली.

२. ओळखीचा अपलाभ घेत शारीरिक संबंध निर्माण करून तिच्याकडून बळजोरीने खंडणी वसूल केली. पीडितेवर भिगवण, तापोळा अशा अनेक ठिकाणांवर नेऊन बळजोरीने संबंध निर्माण केले. इतर आरोपींसह तिच्यावर सामूहिक अत्याचारही केला.

३. एका अनोळखी यू ट्यूबरची (पत्रकाराची) ओळख करून चित्रफिती, छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देत पैसे देण्यास भाग पाडले.

४. पीडितेला ‘तू सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र टिंगरे याला नादी लाव. बलात्काराचा आरोप करून गुन्हा नोंद कर’, असे सांगितल्यानंतर तिने त्यास नकार दिला. ‘आरोपींनी या पीडितेच्या साहाय्याने टिंगरे याला माळरानावर बोलावून हत्या करण्याचा कट केला होता’, अशी माहिती पीडितेने तक्रारीमध्ये नमूद केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा घटनांतून समाजाची नीतीमत्ता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे दिसून येते ! अशा वासनांध नराधमांना कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत करत नाही, तोपर्यंत इतरांवर जरब बसणार नाही आणि अशा घटना थांबणारही नाहीत.