दत्त मंदिराला भूखंड मिळण्यासाठीचे आमरण उपोषण तूर्तास स्थगित !

सिडकोची चर्चेची सिद्धता !

प्रतिकात्मक चित्र

नवी मुंबई – सानपाडा येथील पुरातन दत्त मंदिराला भूखंड देण्याविषयी सिडकोने सकारात्मक चर्चा करण्याची सिद्धता दर्शवली आहे. त्यामुळे पूर्वनियोजित आमरण उपोषण स्थगित केले, अशी माहिती युवा सेनेचे बेलापूर संपर्कप्रमुख भावेश पाटील यांनी दिली. दत्त मंदिरालगतचे भूखंड देवस्थान ट्रस्टकडे विनाशर्त हस्तांतरित करण्यासाठी भावेश पाटील यांनी १२ एप्रिलपासून आमरण उपोषणाची चेतावणी दिली होती.

दत्त मंदिर एक जागृत देवस्थान आहे. वर्ष १९५२ पासून कार्यरत सानपाडा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून या मंदिरात धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या उपक्रमांसाठी मंदिरालगतच्या भूखंड क्रमांक १, २ आणि ३ चा वापर केला जातो; परंतु सिडकोने या भूखंडांच्या विक्रीसाठी प्रयत्न चालू केले आहेत.

खासदार नरेश म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन त्यात ‘हे भूखंड देवस्थान ट्रस्टकडे कायमस्वरूपी हस्तांतरित करावेत, तसेच श्री दत्त मंदिराला विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ म्हणून मान्यता द्यावी’, अशी सूचना केली आहे. त्यानुसार सिडकोने वरील निर्णय दिला.