श्री चिंतामणींच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी वस्त्रसंहिता लागू !

(वस्त्रसंहिता म्हणजे मंदिरात येतांना करायच्या वेशभूषेचे नियम)

पिंपरी (जिल्हा पुणे) – भगवान श्री चिंतामणींचे मंदिर हे केवळ वास्तू नसून, ते श्रद्धा, संस्कृती आणि भक्ती यांचा केंद्रबिंदू आहे. या मंदिराचे पावित्र्य, शांततेचा आदर राखावा. मंदिरातील भक्तीमय वातावरण टिकवण्यासाठी भाविकांनी सहकार्य करावे. मंदिरातील आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या पावित्र्याला शोभेसे असावे. यासाठी मंदिरामध्ये येणार्‍या प्रत्येक भाविक, भक्त यांनी वस्त्रसंहितेचे पालन करावे. श्रींच्या दर्शनासाठी येतांना योग्य पोशाख परिधान करावा, अशी विनंती ‘चिंचवड देवस्थान ट्रस्ट’च्या वतीने करण्यात आली आहे.

श्रींच्या मंदिरामध्ये येतांना पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख करावा. (शर्ट, सदरा, पूर्ण पँट, पायजमा, धोतर किंवा कुर्ता-पायजमा) आपल्या संस्कृतीनुसार पोशाख असावा. स्त्रियांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा. मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे. कोणत्याही भाविक, भक्तांनी अती आधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, टोकदार, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे परिधान करून मंदिर प्रांगणामध्ये येऊ नये, असे सांगण्यात आले.