गोव्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, ६ मार्च (वार्ता.) – गोव्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे पर्यटकांच्या संख्येत घट होत आहे. विशेषत: उत्तर गोव्यातील किनारपट्टी भागातील ‘शॅक्स्’ (‘शॅक्स्’ म्हणजे समुद्रकिनारपट्टीवरील मद्यालय आणि उपहारगृह) आणि उपहारगृहे यांच्या मालकांनी कायदा हातात घेऊ नये. समुद्रकिनार्‍यांवर भांडणे आणि हत्या होत राहिल्यास गोव्यातील निसर्गरम्य समुद्रकिनारपट्टीकडे पर्यटक पाठ फिरवतील, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

मुख्यंमत्री पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात बलात्कार आणि हत्या यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने पर्यटकांची संख्या न्यून होत आहे. पर्यटकांसोबत होत असलेल्या हिंसक कृतींचा गोव्यातील पर्यटन क्षेत्रावर दीर्घकालीन परिणाम होणार आहे. गोमंतकीय परराज्यातील लोकांना स्वतःचा व्यवसाय चालवण्यासाठी देत आहे. अशा व्यवसायात एखाद्या वेळी काही समस्या उद्भवल्यास तेथील कर्मचारी चर्चा करून प्रश्न सोडवण्याऐवजी सरळ सुरी घेऊन समोरच्यावर आक्रमण करत आहेत. समुद्रकिनारपट्टीवरील प्रत्येक व्यावसायिकाने दायित्वाने वागले पाहिजे.’’

मागील २ महिन्यांमध्ये गोव्यात पर्यटक आणि शॅक कर्मचारी यांच्यामध्ये अनेक हिंसक घटना घडल्या आहेत.