बर्लिन, ६ मार्च (वार्ता.) – ‘आयटीबी (इंटरनॅशनल टुरिझम बोर्स) बर्लिन २०२५’ या जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन व्यापार मेळाव्यामध्ये गोवा राज्याला २ ‘पटवा आंतरराष्ट्र्रीय प्रवास पुरस्कारां’नी’सन्मानित करण्यात आले आहे. हा मेळावा जगातील सर्वांत मोठ्या पर्यटन व्यापार मेळाव्यांपैकी एक असल्याने यात गोवा राज्याला पुरस्कार मिळाल्याने भारताचे प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून गोव्याला असलेले महत्त्व यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
गोव्यातील पर्यटन क्षेत्राच्या प्रगतीसाठी लाभलेले उत्कृष्ट नेतृत्व आणि प्रशासन यांसाठी गोवा सरकारचे माननीय पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांना ‘टुरिझम मिनिस्टर ऑफ द इयर – इंडिया’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, तसेच गोवा राज्याची वैविध्यपूर्ण पर्यटन सेवा, शाश्वत उपक्रम आणि जागतिक आवड लक्षात घेऊन गोवा राज्याला ‘डेस्टिनेशन ऑफ द इयर – इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आयटीबी बर्लिन येथे आयोजित समारंभात गोवा सरकारचे पर्यटन संचालक केदार नाईक यांनी पर्यटनमंत्र्यांच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले.

याविषयी मनोगत व्यक्त करतांना पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले, ‘‘जागतिक व्यासपिठावर मिळालेली ही ओळख आम्ही उत्तरदायित्व आणि नाविन्यपूर्ण पर्यटन यांसाठी वचनबद्ध असल्याचा पुरावा आहे. जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असतांनाच गोवा राज्य आपला समृद्ध वारसा आणि नैसर्गिक सौंदर्य यांचे जतन करून शाश्वत अन् उच्च मूल्य असलेल्या पर्यटनाचा अनुभव देत आहे.’’ या पुरस्कारांमुळे गोव्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्थान अधिक बळकट झाले आहे, तसेच जागतिक प्रवाशांच्या पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून गोव्याविषयीचे आकर्षण अधिकच वाढले आहे.