पाकिस्तानला बलुचिस्तान स्वतंत्र होण्याची भीती !
इस्लामाबाद – बलुचिस्तानमध्ये ‘बलुच राजी अजोई संगर’च्या (‘बी.आर्.ए.एस्., ब्रास’च्या) बैठकीत, सर्व बलुच गटांनी पाकिस्तान सरकार आणि सैन्य यांच्याविरुद्ध एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत भाग घेणार्या गटांमध्ये बलुच लिबरेशन आर्मी, बलुचिस्तान लिबरेशन फ्रंट, बलुच रिपब्लिकन गार्ड्स, सिंधी लिबरेशन ऑर्गनायझेशन आणि सिंधुदेश रिव्होल्युशनरी आर्मी यांचा समावेश आहे. या गटांनी चिनी प्रकल्पांवरही आक्रमण केले आहे.
१.बलुच गटांनी एकत्रितपणे लढण्याचा निर्णय घेतल्याने पाकिस्तानसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. बलुचिस्तानच्या अनेक भागात बंडखोर गटांनी आधीच पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणले आहे. या नवीन निर्णयामुळे पाकिस्तान सरकारला बलुचिस्तान वेगळे होण्याची भीती सतावत आहे.
२. ‘बलुच राजी अजोई संगर’ने प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चीन किंवा इतर कोणतीही शक्ती पाकिस्तान सरकारच्या संगनमताने बलुचमधील संसाधनांचा अपवापर करू शकत नाही. आम्ही पाकिस्तानी सैन्याविरुद्धचे युद्ध अधिक आक्रमकतेने आणि संपूर्ण शक्तीनिशी लढू. सर्व गटांच्या एकत्रित लढ्यामुळे बलुच स्वातंत्र्य प्रत्यक्षात येईल.
३. बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तानविरुद्धचा रोष नवीन नाही; पण चीनच्या प्रकल्पांमुळे अलीकडच्या काळात तो वाढला आहे. बलुच लोकांना वाटते की, चीन त्यांच्या संसाधने लूटत असून या कामी पाकिस्तान त्यांना साहाय्य करत आहे.