‘मंदिरातील शिवलिंग घरी स्थापित केल्यास भरभराट होईल’, असे पडलेले स्वप्न !

द्वारका (गुजरात) – येथे २५ फेब्रुवारीच्या उत्तररात्री भीडभंजन महादेव मंदिरातील शिवलिंग चोरीला गेल्याची घटना घडली होती. या घटनेचे अन्वेषण करतांना पोलिसांनी द्वारकेहून ५०० किमी अंतरावर असलेल्या साबरकंठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथून एकाच कुटुंबातील ८ जणांना अटक केली. चोरीचे कारण समोर आल्यावर सर्वांनाच धक्का बसला. या कुटुंबातील एका लहान मुलीला असे स्वप्न पडले होते की, द्वारकेतील भीडभंजन महादेव मंदिरातील शिवलिंगाची घरात स्थापना केली, तर त्यांच्या घराची भरभराट होईल. त्यानुसार मुलीच्या कुटुंबियांनी दोन चारचाकी वाहने घेऊन द्वारका गाठली आणि २५ फेब्रुवारीला उत्तररात्री ३ ते ५ या वेळेत पिंड चोरून नेत ती स्वत:च्या घरात स्थापित केली.
१. २६ फेब्रुवारीला असलेल्या महाशिवरात्रीच्या दिवशी शिवभक्त भीडभंजन महादेव मंदिरात आले असता पिंड नसल्याचे पाहून संतप्त झाले.
२. आरंभी शिवलिंग अरबी समुद्रामध्ये टाकण्यात आल्याच्या संशयाने पोलिसांनी ‘स्कूबा डायव्हिंग’ (समुद्रात खोलवर जाण्याची व्यवस्था) पथकाच्या साहाय्याने समुद्रात शोधमोहीम राबवली. तेथे हाती काही न लागल्याने अधिक अन्वेषण केले असता सत्य समोर आले आणि सर्वांनाच धक्का बसला.
३. शिवलिंगाची चोरी संपत्तीच्या लालसेने करण्यात आली नव्हती. विशेष म्हणजे केवळ शिवलिंगच चोरीला गेले होते. तेथे असलेल्या देवतांच्या मूर्तींना घातलेली मौल्यवान आभूषणे जशीच्या तशी होती.