रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’चे सूक्ष्म परीक्षण !

‘२.२.२०२५ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी ‘आयुष्य होम’ आणि अनिष्ट शक्तींच्या त्रासांच्या निवारणासाठी ‘देवी होम’ हे २ होम करण्यात आले. यांपैकी ‘देवी होमा’च्या वेळी मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्म परीक्षण करता आले. ते येथे दिले आहे.

गोवा येथील सनातनचा रामनाथी आश्रम

१. ध्यानस्थ भगवान शिवाचे दर्शन होणे 

‘देवी होम’ चालू असतांना मला यज्ञकुंडाच्या वर २ फूट अंतरावर ध्यानस्थ भगवान शिवाचे दर्शन झाले. त्याच्या ओंजळीत पणतीत तेवत असलेल्या ज्योतीप्रमाणे एक ज्योत दिसली. ही ज्योत पाहून मला प्रश्न पडला, ‘ही ज्योत कसली आहे ?’

२. भगवान शिव परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे रक्षण करत असणे 

तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘ती परात्पर गुरु डॉक्टरांची प्राणज्योत असून तिचे रक्षण स्वतः शिवच करत आहे. परात्पर गुरु डॉक्टरांवर सूक्ष्मातून अनिष्ट शक्तींची पुष्कळ आक्रमणे होत असतात. त्याविषयी साधकांनी कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता नाही.’ काही सेकंदांनंतर शिवाच्या हातातील ज्योत शिवाच्या हृदयस्थानी दिसली.

यापूर्वी देवाच्या कृपेमुळे मला अनेक यागांचे सूक्ष्म परीक्षण करता आले. प्रत्येक याग चालू असतांना नेहमी मला ‘अग्निदेव आणि स्वर्गलोकातून यागाच्या ठिकाणी आलेल्या देवता’ यांचे सूक्ष्मातून दर्शन होत असे. या वेळी प्रथमच मला यागाच्या वेळी सूक्ष्मातून भगवान शिवाचे दर्शन झाले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.२.२०२५)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक