DK Shivakumar Visit To Sadguru Mahashivratri Event : सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्र्यांवर स्वपक्षातील नेत्याकडून टीका !

सद्गुरु जग्गी वासुदेव व कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार

बेंगळुरू – कर्नाटक काँग्रेस राज्य समितीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी अलीकडेच सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या ‘इशा फाऊंडेशन’ने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते. त्या कार्यक्रमाची काही छायाचित्रे त्यांनी ‘एक्स’वरून प्रसारित केली होती. यावरून अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव पी.व्ही. मोहन यांनी टीका केली आहे. पी.व्ही. मोहन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये डी.के. शिवकुमार यांना टॅग केले आणि लिहिले की, शिवकुमार एका धर्मनिरपेक्ष पक्षाचे नेते असतांना ते राहुल गांधींची खिल्ली उडवणार्‍या व्यक्तीचे (सद्गुरु जग्गी वासुदेव यांचे) आभार कसे मानू शकतात ?

१. डी.के. शिवकुमार यांनी ‘एक्स’वर प्रसारित केलेल्या पोस्टमध्ये महाशिवरात्रीनिमित्त कोइम्बतूर येथील ईशा योग केंद्रात आमंत्रित केल्याविषयी सद्गरूंचे आभार मानले होते. यामध्ये त्यांनी तिथला अनुभव कथन केला आणि निमंत्रणपत्राचे छायाचित्र प्रसारित केले आहे. या कार्यक्रमात डी.के. शिवकुमार देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत व्यासपिठावर उपस्थित होते.

२. पी.व्ही. मोहन म्हणाले की, जग्गी वासुदेव आणि ईशा फाउंडेशन यांची विचारसरणी भाजप आणि रा. स्व. संघ यांच्यासारखीच आहे. (काँग्रेसचा जावईशोध ! – संपादक) आपण या विचारसरणीच्या पूर्णपणे विरुद्ध आहोत. राहुल गांधी यांनीही अनेक वेळा म्हटले आहे की, संघाच्या विचारसरणीचे पालन करणारा कुणीही पक्ष सोडू शकतो. ते म्हणाले की, डी.के. शिवकुमार तेथे गेल्याने त्यांना कोणतीही अडचण नाही; परंतु त्यांच्या कृतीतून पक्षाच्या मूल्यांचे प्रतिबिंब पडले पाहिजे.

संपादकीय भूमिका

डी.के. शिवकुमार मशिदीत गेले असते किंवा मुसलमानांच्या एखाद्या कट्टरतावादी संघटनेच्या कार्यक्रमात उपस्थित असते, तर त्यांच्या पक्षातील नेत्यांनी त्यांना लक्ष्य केले असते का ? धर्मनिरपेक्षता म्हणजेच हिंदुद्वेषाचे विष काँग्रेसवाल्यांमध्ये किती भिनले आहे, हेच यातून लक्षात येते !