Terrorist Camps At Bangladesh Border : बांगलादेश सीमेवर पाकिस्तान उभारत आहे आतंकवादी प्रशिक्षण तळ

‘उल्फा’च्या आतंकवाद्यांना प्रशिक्षण देऊन आसाममध्ये घातपात करण्याचा कट

ढाका (बांगलादेश) – पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय. (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) बांगलादेशाच्या भूमीचा वापर करून भारतात अशांतता पसरवू इच्छिते. भारताच्या ईशान्येकडील प्रदेशाला अस्थिर करण्याच्या प्रयत्नात आय.एस्.आय. आसाममधील ‘उल्फा’ (युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम – आसामच्या स्वातंत्र्यासाठी संयुक्त मोर्चा) या आतंकवादी संघटनेचे प्रशिक्षण शिबिर पुन्हा चालू करण्याच्या सिद्धतेत आहे. आय.एस्.आय.च्या अधिकार्‍यांनी नुकताच बांगलादेशात आलेला उल्फा नेता आणि कुख्यात आतंकवादी परेश बरुआ याची भेट घेतल्याचे वृत्त आहे.‘द ट्रिब्यून’ने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

१. आसाम आणि ईशान्येकडील राज्यांजवळ बांगलादेशात काही प्रशिक्षण शिबिरे उघडण्यात आली आहेत. ही शिबिरे पूर्वीही चालू होती; पण शेख हसीना पंतप्रधान असतांना बंद करण्यात आली होती.

२. महंमद युनूस सरकारच्या काळात आय.एस्.आय.ला पुन्हा बांगलादेशात प्रवेश मिळाला आहे आणि तिने ही शिबिरे पुन्हा चालू केली आहेत. भारताच्या ईशान्य प्रदेशाला अस्थिर करण्याच्या मोठ्या कटाचा हा एक भाग आहे.

३. भारतीय सुरक्षादलांनी अलीकडेच बांगलादेश सीमेपलीकडून अरबी, उर्दू आणि बंगाली भाषेतील वायरलेस संदेश रोखल्याचा दावा केला आहे. यामुळे बंगालच्या सीमेवरील भागात आय.एस्.आय.च्या उपस्थितीबद्दल चिंता निर्माण झाली आहे. ही परिस्थिती भारताच्या सुरक्षेसाठी एक मोठा धोका आहे.

बरुआ याची शिक्षा अल्प केली !

युनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) ही भारतातील ईशान्येकडील आसाम राज्यात सक्रीय असलेली एक आतंकवादी संघटना आहे. त्यात सशस्त्र संघर्षाद्वारे आसामला स्वतंत्र देश बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संघटनेचा सर्वांत महत्त्वाचा चेहरा परेश बरुआ आता बांगलादेशात आहे. गेल्या महिन्यात, बांगलादेशाच्या न्यायालयाने बरुआ याची जन्मठेपेची शिक्षा १४ वर्षांपर्यंत अल्प केली. बांगलादेशातील अलीकडच्या घडामोडी पहाता बरुआ याला लवकरच निर्दोष मुक्त केले जाऊ शकते, असे गुप्तचर यंत्रणांना वाटते. ईशान्येकडील त्याच्या माहितीचा उपयोग आय.एस्.आय. या प्रदेशाला अस्थिर करण्यासाठी करू शकते.

संपादकीय भूमिका

बांगलादेशातील अस्थिरतेचा भारताला किती त्रास होणार आहे, हे प्रतिदिन समोर येत आहे. अशा स्थितीत भारत किती सतर्क आहे ? असा प्रश्न उपस्थित होतो !