वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांनी डिजिटल माध्यमाद्वारेच दंड भरण्याचा आदेश

रोख रकमेद्वारे जमा करण्यात आलेल्या चलनाच्या पैशांचा पोलीस कर्मचार्‍यांनी अपहार केल्यामुळे निर्णय !

पणजी, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा राज्यात १ मार्च २०२५ पासून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना जारी करण्यात आलेल्या चलनाची रक्कम केवळ डिजिटल पद्धतीने भरावी, असा आदेश वाहतूक पोलीस उपअधीक्षक सुदेश नार्वेकर यांनी जारी केला आहे. यापुढे दंडाची रक्कम रोख स्वरूपात स्वीकारली जाणार नाही. डिजिटल पद्धतीने पैसे भरण्यास चालना द्यावी आणि चलनाची रक्कम भरण्यात सुलभता यावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, ई चलन यंत्रांवरील ‘क्यू आर कोड’ (‘क्विक रिस्पॉन्स कोड’ म्हणजे बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा) किंवा केंद्रीय वाहतूक खात्याच्या संकेतस्थळावरून डिजिटल पद्धतीने दंडाची रक्कम भरता येईल.

यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी डिचोली पोलीस ठाण्यात रोख रकमेद्वारे जमा करण्यात आलेल्या चलनाच्या पैशांचा अपहार करण्यात आला होता आणि एका महिला कर्मचार्‍याने सुमारे १७ लाख ३० सहस्र रुपयांची अफरातफर केल्याचे आरोप झाले होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी डिजिटल पद्धतीने रक्कम भरण्याविषयी वाहतूक खात्याचा विचार चालू होता.

संपादकीय भूमिका

पोलीस कर्मचार्‍यांनी केलेल्या भ्रष्टाचारामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना डिजिटल माध्यमाद्वारेच दंड भरण्याची शिक्षा का ?