Hindu Puja At Ladle Mashak Dargah : हिंदूंनी महाशिवरात्रीला केली ‘लाडले मशक दर्ग्या’तील शिवलिंगाची पूजा !

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या अनुमतीनंतर हिंदूंचा मार्ग मोकळा !

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक उच्च न्यायालयाने महाशिवरात्रीनिमित्त अलांड येथील ‘लाडले मशक दर्गा संकुला’त असलेल्या राघव चैतन्य शिवलिंगाची पूजा करण्याची हिंदूंना अनुमती दिली. त्यानंतर हिंदूंनी येथे पूजा केली. यासंदर्भात हिंदु संघटनांनी याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. या निर्णयामुळे कर्नाटक लवादाचा पूर्वीचा आदेश कायम राहिला आहे, ज्याने या ठिकाणी धार्मिक विधींना अनुमती दिली होती.

आदेशानुसार मुसलमानांना सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत विधी करण्याची अनुमती देण्यात आली होती, तर दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत, हिंदु भाविकांनी दर्गा परिसरात असलेल्या राघव चैतन्य शिवलिंगाची पूजा केली. उच्च न्यायालयाने दर्ग्यात पूजा करण्यासाठी केवळ १५ लोकांना प्रवेश देण्याची अनुमती दिली होती. यावर्षी येथे जिल्हा प्रशासनाने जमावबंदी आदेश लागू केला होता.

१४ व्या शतकातील सूफी संत आणि १५ व्या शतकातील हिंदु संत राघव चैतन्य यांच्याशी संबंधित हा दर्गा आहे. वर्ष २०२२ मध्ये दर्ग्याच्या धार्मिक अधिकारांवरून वाद झाला होता.