Champions Trophy Terror Alert : ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’च्या वेळी पाकिस्तानमध्ये विदेशी नागरिकांच्या अपहरणाची शक्यता ! – गुप्तचर संस्था

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये होणार्‍या ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट स्पर्धेच्या वेळी विदेशी नागरिकांच्या सुरक्षेविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ‘इस्लामिक स्टेट खोरासान’ (आय.एस्.के.पी.) या आतंकवादी संघटनेने विदेशी नागरिकांचे, विशेषतः चिनी आणि अरबी नागरिकांचे अपहरण करण्याची योजना आखली आहे, अशी चेतावणी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेने दिली आहे.

१. ‘आय.एस्.के.पी.’ महत्त्वाच्या ठिकाणांवर सतत लक्ष ठेवून असल्याची माहिती समोर आली आहे. यांमध्ये विदेशी लोक वापरत असलेली बंदरे, विमानतळ, कार्यालये आणि निवासी क्षेत्रे समाविष्ट आहेत.

२. इस्लामिक स्टेटने विदेशी नागरिकांचे अपहरण केल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवण्याची योजना आखली आहे आणि चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कालावधीत ते अधिक सक्रीय असतील, असेही अहवालात म्हटले आहे.

३. पाकिस्तानमध्ये विदेशी नागरिकांच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिथे परदेशी लोकांवर अनेक आक्रमणे झाली आहेत. वर्ष २००९ मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघावर आक्रमण झाले होते. वर्ष २०२४ मध्ये शांगला येथे चिनी अभियंत्यांवर आक्रमण झाले होते.

संपादकीय भूमिका

पाकिस्तान हा आतंकवाद्यांचा अड्डा आहे, हे भारताने अनेक वेळा आंतरराष्ट्रीय व्यासपिठावरून स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट चाहते यांच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास पाकिस्तानमध्ये स्पर्धा आयोजित करणार्‍या ‘आयसीसी’ला उत्तरदायी धरले पाहिजे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही !