शनिशिंगणापूर येथील शनिदेवाला ‘ब्रँडेड’ तेलांनी अभिषेक !

‘शनैश्‍वर देवस्‍थान विश्‍वस्‍त मंडळा’चा निर्णय !

१ मार्च २०२५ पासून कार्यवाही !

अहिल्‍यानगर – शनिशिंगणापूर देवस्‍थानाच्‍या नव्‍या नियमांनुसार भाविकांना १ मार्चपासून केवळ ‘ब्रँडेड’ (नामांकित) आणि शुद्ध (रिफाईंड) तेलानेच अभिषेक करता येणार आहे. शनिदेवाच्‍या स्‍वयंभू शिळेची झीज रोखण्‍यासाठी देवस्‍थानकडून हा निर्णय घेण्‍यात आला आहे. शनिदेवाचे दर्शन आणि तेल वहाण्‍यासाठी महाराष्‍ट्रासह भारतातून भाविकांची मोठी गर्दी होत असते. यापूर्वी शनिदेवाला भाविक अनेक प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल अर्पण करत असत. काही तेलांमध्‍ये भेसळ असल्‍यामुळे त्‍याचा परिणाम शनिदेवाच्‍या शिळेवर होत असल्‍याचे अन्‍न आणि भेसळ पडताळणी विभागाचे म्‍हणणे आहे. भेसळयुक्‍त तेलामुळे मूर्तीच्‍या पृष्‍ठभागाची झीज वाढत आहे. त्‍यामुळे ‘शनैश्‍वर देवस्‍थान विश्‍वस्‍त मंडळा’ने हा निर्णय घेतला आहे.

या निर्णयावर ग्रामसभा आणि विश्‍वस्‍त मंडळांचे पदाधिकारी यांच्‍या बैठकीमध्‍ये चर्चा करण्‍यात आली. ग्रामस्‍थ, भाविक आणि अन्‍न प्रशासनाच्‍या तज्ञांनी हा निर्णय चांगला असल्‍याचे म्‍हटले आहे. शुद्ध तेल अर्पण केल्‍यामुळे शनिदेवाची स्‍वयंभू शिळा सुरक्षित राहील.