प्रदूषण करणार्या वाहनांवर कारवाई !
नवी मुंबई – वाहनांमधून निघणारा धूर आणि त्यातून निर्माण होणार्या वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनचालकांना प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र काढण्याच्या सूचना दिल्या जातात. तरीही पीयूसी प्रमाणपत्र नसलेली वाहने निदर्शनास येत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. एप्रिल २०२४ ते डिसेंबर २०२४ या ९ महिन्यांच्या कालावधीत ३ सहस्र १७३ वाहनांवर कारवाई करत दंडवसुली केली आहे.
‘भाडिप’ने अश्लील कार्यक्रमाच्या भागाचे प्रसारण पुढे ढकलले !
मुंबई – रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाल्यावर ‘भारतीय डिजिटल पार्टी’ या वाहिनीच्या ‘अतिशय निर्ल्लज कांदेपोहे’ या भागाचे प्रसारण पुढे ढकलण्यात आले आहे. ज्यांनी या कार्यक्रमासाठी तिकिटांची नोंदणी केली होती, त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत.
रूपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारे अटकेत
मुंबई – महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याविरोधात सामाजिक माध्यमांतून आक्षेपार्ह, अश्लील आणि अपमानास्पद पोस्ट केल्याप्रकरणी २ आरोपींना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. आकाश डाळवे (वय ३० वर्षे) आणि अविनाश बापू पुकळे (वय ३० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
संपादकीय भूमिका : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर आक्षेपार्ह पोस्ट केली जात असेल, तेथे सामान्य महिलांच्या सुरक्षेची काळजी कोण घेणार ?
सांडपाण्यामुळे प्रदूषण, मलनिःस्सारण केंद्राचे परीक्षण होणार !
भाईंदर – मीरा-भाईंदर शहरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे मलनि:स्सारण केंद्र हे संथ गतीने काम करत आहे. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या तशीच आहे. या केंद्राचे शासनाच्या महाप्रीत (महात्मा फुले नवनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्रायोगिक मर्यादित) संस्थेच्या वतीने लेखा परीक्षण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
लाचखोर वाहतूक पोलिसाला अटक
डोंबिवली – एका टेम्पोचालकाकडून ५०० रुपयांची लाच घेतांना कल्याण शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील हवालदार प्रवीण गोपाळे यांना शहाड येथील वाहतूक पोलीस चौकीत ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ११ फेब्रुवारी या दिवशी अटक केली. त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
मागील आठवड्यात महापालिकेच्या कार्यालयातील लिपिक प्रशांत धिवर याला मटणविक्रेत्याकडून दीड लाख रुपयांची लाच घेतांना पकडले आणि निलंबित करण्यात आले होते.