
मुंबई – चालत्या बसमध्ये युवतीचा विनयभंग करणार्या इरफान हुसेन शेख (वय ३१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. वरळी येथे काम करत असलेल्या आस्थापनातून इरफान याला गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले. तो वांद्रे येथे रहातो.
पीडित युवती १० एप्रिल या दिवशी सकाळी प्रभादेशी ते कुरणे चौक या मार्गाने बसने प्रवास करत असतांना एका अनोळखी युवकाने तिची छेड काढत तिचा विनयभंग केला. या प्रकरणी पीडित युवतीने केलेल्या तक्रारीवरून १६ एप्रिल या दिवशी वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता; मात्र विनयभंग करणार्या युवकाचे नाव आणि ठावठिकाणा यांची माहिती नसल्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेर्यांतील चित्रण पाहिले. त्या वेळी युवक वरळी येथे बसमधून उतरल्याचा व्हिडिओ पोलिसांना मिळाला. त्यावरून पोलिसांनी आरोपीला शोधून काढले. इरफान याने गुन्हाची स्वीकृती दिली असून पोलिसांकडून पुढील कारवाई चालू आहे.