France AI Action Summit : फ्रान्समधील जागतिक ‘एआय’ परिषदेला पंतप्रधान मोदी उपस्थित रहाणार !

(‘एआय’ म्हणजे ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ अर्थात् कृत्रिम बुद्धीमत्ता)

पॅरिस (फ्रान्स) – येथे १० फेब्रुवारीपासून २ दिवसांच्या कृत्रिम बुद्धीमत्तेच्या शिखर परिषदेला प्रारंभ होत आहे. परिषदेत कृत्रिम बुद्धीमत्तेचे भू-राजकीय परिणामांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्षपद फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन भूषवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दौर्‍यावर असून तेही या परिषदेला उपस्थित रहातील. परिषदेला जागतिक नेते, महत्त्वपूर्ण आस्थापनांचे अधिकारी, तसेच तज्ञसुद्धा उपस्थित असतील. कृत्रिम बुद्धीमत्तेचा प्रत्येकाला लाभ करून घेतांना त्याचे अपरिमित धोके थांबवण्याच्या दृष्टीने ‘एआय’चा कसा वापर करून घेता येईल, यावर दोन दिवस विचारमंथन केले जाईल.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ‘एआय’साठी तब्बल ५०० अब्ज डॉलर्सची (४३ लाख कोटी रुपयांहून अधिकची) गुंतवणूक घोषित केली आहे. उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स हे या परिषदेला उपस्थित रहाणार असून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी त्यांच्या विशेष दूताला या परिषदेला पाठवले आहे. ट्रम्प यांची ‘एआय’संबंधीची महत्त्वाकांक्षा, तसेच चीनची एआय प्रणाली ‘डीपसीक’ यांचा या परिषदेवर परिणाम होईल, असे सांगितले जात आहे.