

फोंडा (गोवा) – हिमाचल प्रदेशमधील साधुपुल, शिमला येथील विवेकानंद विद्यानिकेतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या येथील आध्यात्मिक संशोधन केंद्राला भेट दिली. या वेळी त्यांच्यासमवेत त्यांचे शिक्षक उपस्थित होते. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता शॉन क्लार्क यांनी ‘विश्वविद्यालयाच्या वतीने करण्यात येणारे सूक्ष्मस्तरावरील संशोधनकार्य आणि जीवनातील साधनेचे महत्त्व’ याविषयी विद्यार्थ्यांना अवगत केले. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने सिद्ध करण्यात आलेले संशोधनावर आधारित काही व्हिडिओ विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याविषयी शाळेचे मुख्य शिक्षक रवि मेहता यांनी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे आभार मानले.
विद्यार्थी आणि शिक्षक यांची सनातन आश्रमालाही सदिच्छा भेट !

विवेकानंद विद्यानिकेतनचे विद्यार्थी आणि शिक्षक यांनी ६ फेब्रुवारी २०२५ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमालाही सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनच्या साधकांनी त्यांना आश्रमात चालणारे राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची माहिती दिली. आश्रम पाहिल्यानंतर अभिप्राय व्यक्त करतांना शिक्षक रवि मेहता यांनी आश्रमाचे कार्य अति उत्तम आणि प्रेरणादायी असल्याचे सांगितले. सूक्ष्म जगताविषयीचे प्रदर्शन पाहून ते म्हणाले की, हे प्रदर्शन जीवन आचरण आणि जीवन अध्यात्म यासाठी संकल्पस्वरूप आहे. या गोष्टी आमची संस्था पुढे नेण्यासाठी शक्ती प्रदान करणार्या आहेत.