Ganesh Murti Visarjan : पीओपी मूर्तींच्या विसर्जनास बंदी घातल्याने मूर्ती विसर्जनाविनाच परत नेल्या !

मुंबईत माघी गणेशोत्सवाच्या वेळी निर्णयाची कार्यवाही झाल्याने भाविक संतापले !

मुंबई – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (‘पीओपी’च्या) मूर्तींची विक्री आणि विसर्जन यांवर मुंबई उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. महानगरपालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन माघी गणेशोत्सवातील पीओपी गणेशमूर्तींचे नैसर्गिक जलस्रोतांमध्ये विसर्जन करण्यास गणेशोत्सव मंडळांना मंडपांना प्रतिबंध केला. पश्‍चिम उपनगरांतील गोराई, बोरिवली आणि कांदिवली येथील अनेक गणेशोत्सव मंडळांना पीओपीच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करता आलेले नाही. कांदिवली आणि आसपासच्या परिसरातील काही मंडळांनी सातव्या दिवशी म्हणजे ७ फेब्रुवारी या दिवशी गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुका काढल्या होत्या. विसर्जनस्थळी असलेला कडेकोट बंदोबस्त आणि न्यायालयाचे आदेश लक्षात घेऊन मंडळांनी विसर्जन न करताच गणेशमूर्ती पुन्हा मंडपात नेल्या आणि झाकून ठेवल्या. चारकोपचा राजा सार्वजनिक गणेश मंडळासह अन्य काही मंडळांच्या गणेशमूर्ती विसर्जनाविना पुन्हा थेट मंडपात नेण्यात आल्या. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. ‘मंडपात आणलेल्या गणेशमूर्तींचे पुढे काय करणार ?’ याविषयी मंडळांनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.

‘प्रदूषणाच्या कारणावरून वर्ष २०२० मध्ये पीओपी मूर्तींवरील बंदीची काटेकोरपणे कार्यवाही करावी’, असा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महानगरपालिकेला दिले होते. काही दिवसांपूर्वी या संदर्भातील याचिकेवर न्यायालयाने परत एकदा बंदीचे काटेकोर पालन करण्याचा आदेश दिला होता.

संपादकीय भूमिका 

पीओपीमुळे प्रदूषण होत नाही, असा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला असूनही न्यायालयाने असा निर्णय देणे आणि महापालिकेने त्याची कार्यवाही करणे, हे आकलनाच्या पलीकडचे आहे !