जो धर्मासमवेत असेल, तोच जिवंत राहील ! – गुलाबराव पाटील, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री

भगव्या झेंड्यामुळे मंत्री झालो असून हिंदु असल्याचा अभिमान असल्याचेही केले स्पष्ट !

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव – हिंदु धर्मच टिकणार नाही, तर जात कशी टिकणार ? जो धर्मासमवेत असेल, तोच जिवंत राहील. जो धर्माच्या विरोधात जाईल, त्याचे काही खरे नाही. भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री झालो, याचा मला अभिमान आहे. त्यामुळे धर्मकार्य आणि भगवा झेंडा यांच्याशी सगळ्यांनी कायम एकनिष्ठ रहाणे ही काळाची आवश्यकता आहे, असे आवाहन शिवसेनेचे आमदार आणि पाणीपुरवठा अन् स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते जळगावच्या नशिराबाद येथील एका कीर्तन सोहळ्यात बोलत होते. (नशिराबाद हे नाव पालटण्यासही आता गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घ्यावा ! – संपादक)

पाटील पुढे म्हणाले, ‘‘आपण किती जातीपातींमध्ये विभागलो, त्यापेक्षा आपण पहिल्यांदा हिंदु आहोत आणि मग इतर जातीचे आहोत, हे लक्षात ठेवायला हवे. हिंदु धर्म टिकला पाहिजे. त्यामुळे धर्मसेवा चालू आहे. या धर्मसेवेला आपण सर्व जण साहाय्य करत असतो. पुढील काळातही धर्मकार्यासाठी मी नेहमी साहाय्य करीन.’’