महंत बालकनाथ योगी, आमदार, भाजप, राजस्थान

प्रयागराज – देशाची प्रगती झाली, तर संपूर्ण जग आपल्याकडे आकर्षित होईल. त्यामुळे आपण सर्वांनी देशाला एक सक्षम राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे, असे वक्तव्य राजस्थानमधील भाजपचे आमदार तथा गोरक्षनाथ आखड्याचे महंत बालकनाथ योगी यांनी केले. सनातन प्रभातच्या पत्रकारांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही गोरक्षनाथ आखाड्यातील आहेत. महंत बालकनाथ योगी हे राजस्थान येथील तिजारा मतदार संघाचे विद्यमान आमदार आहेत.
ते पुढे म्हणाले की,
१४४ वर्षांनंतर आलेल्या महाकुंभाचा अनुभव घेता येत असल्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो. संत परंपरेत दीक्षा घेतल्यामुळे मी प्रत्येकात ईश्वर पहात असतो; मात्र हिंदूंच्या पवित्र मेळ्याला काही अधर्मी लोक अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही गोष्टीच्या मुळाशी पोहचले, तर तिथे सनातन धर्मच आहे, हे लक्षात येते. हे सर्व इतरांच्या लक्षात येऊ नये; म्हणून काही परधर्मीय महाकुंभमेळ्याला अपकीर्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.