तो दिवस होता शुक्रवार, ३० जानेवारी १९४८. देशाची फाळणी होऊन आणि स्वातंत्र्य मिळून केवळ साडेपाच मास झालेले होते. देहलीतील बिर्ला भवनच्या पाठीमागील हिरवळीवर नेहमीप्रमाणे सर्व धर्म प्रार्थनेसाठी म. मोहनदास करमचंद गांधी जात होते. वेळ सायंकाळी साधारण ५.१५ वाजताची होती. म. गांधी, त्यांच्या भावाची नात मनू आणि तिच्या सहकारी मुलीच्या आधाराने पायर्या चढून प्रार्थनेच्या ठिकाणी हिरवळीवर चालले होते. तेवढ्यात प्रार्थनेसाठी जमलेल्या समुदायामधून एका व्यक्तीने पुढे येऊन म. गांधींवर पिस्तुलातून भराभर ३ गोळ्या झाडल्या. म. गांधींची हत्या झाल्याची दुःखद बातमी वणव्यासारखी देशभर पसरली. त्या वेळी माझे वय ७ वर्षांचे होते. आम्ही पुणे येथे भवानी पेठेतील डावरे वाड्यामध्ये रहात होतो. डावरे वाडा म्हणजे दोन वाडे एकत्र केलेला मोठा थोरला वाडा होता. एकत्र कुटुंबपद्धत असल्यामुळे एका छताखाली आम्ही साधारण ४० माणसे राहात होतो, त्यांपैकी ८ तरुण होते. माझे आजोबा धर्मवीर विश्वासराव डावरे कुटुंबप्रमुख होते, त्यांना सर्वजण आप्पा म्हणत असत. त्या वेळच्या चित्तथरारक घटना आजही माझ्या डोळ्यांसमोर उभ्या रहातात.
महात्मा गांधींची हत्या करणाराचे नाव नथुराम गोडसे असल्याचे वृत्त त्याच दिवशी, म्हणजे ३० जानेवारीच्या सायंकाळीच सर्वत्र पसरले होते. नथुराम गोडसे पुण्यातील ‘अग्रणी’ (पुढे ‘हिंदू-राष्ट्र’) या वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक असून ते ब्राह्मण असल्याचे महाराष्ट्रामध्ये सर्वत्र ज्ञात होते. ‘पुण्यातील ब्राह्मणांनी गांधींना मारले’, असे भांडवल बनवून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील समाजविरोधी संघटनांच्या गुंडांनी महाराष्ट्रातील, विशेषतः पुण्यातील ब्राह्मणांची घरे जाळण्याचा सपाटा लावला होता. त्या काँग्रेसच्या गुंडांनी ब्राह्मणांची घरे जाळण्याच्या पद्धतशीर सूची बनवल्या होत्या. त्या सूचीमध्ये डावरे यांचे स्थान अग्रस्थानी होते. रात्री ८.३० वाजता ‘ऑल इंडिया रेडिओ’च्या देहली स्टेशनवरून पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी देशाला उद्देशून भाषण केले. त्यात ते म्हणाले, ‘हत्या करनेवाला कोई हिंदू पागल है ।’
१. डावरे यांच्या वाड्यावर १०० काँग्रेसी गुंडांनी आक्रमण केल्यावर त्याला केलेला प्रतिकार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29215732/Dharmaveer_Vishwasrao_daware.png)
रात्री ९ वाजता साधारण १०० काँग्रेसी गुंडांचा जमाव डावरे वाडा जाळण्यासाठी हातात जळते पलिते घेऊन चालून आला. असे होण्याची शक्यता जाणून विश्वासरावांनी घरातील सर्वांना सिद्ध रहाण्यास सांगितले होते. विशेषतः तरुणांना काठ्या घेऊन सिद्ध रहाण्यास सांगितले होते. उत्तरेला घराच्या दर्शनी भागात तळमजल्यावर एका भाडेकरूचे तेलाचे दुकान आणि वर जाण्याच्या जिन्याचा दरवाजा होता. पूर्वेकडील बोळामध्ये ३ दरवाजे आणि दक्षिणेच्या बोळामध्ये १ दरवाजा, असे सर्व दरवाजे लाकडी होते. केवळ उत्तरेचा दर्शनी दरवाजा आणि दक्षिणेकडील दरवाजा वापरात असून इतर दरवाजे कायम बंद ठेवले जात असत. घराच्या भिंती ३ फूट जाडीच्या दगड-विटांच्या चुन्यामध्ये बांधलेल्या भक्कम होत्या. काँग्रेसी गुंडांच्या जमावाने वाड्यावर आक्रमण करून त्यांनी त्यांचा मोर्चा लाकडी दरवाजांकडे वळवला. आमच्या कुटुंबातील तरुण हातात काठ्या घेऊन घरातून बाहेर पडले आणि ते जमावाच्या आक्रमणाला प्रतिकार करू लागले. असा प्रतिकार काँग्रेसी गुंडांना पूर्णतः अनपेक्षित होता. तरीसुद्धा जमावाने जळत्या पलित्यांच्या साहाय्याने घराच्या लाकडी दरवाजांना आग लावण्याचा प्रयत्न केला. घरातील स्त्रियांनी लाकडी दरवाजांवर सतत पाणी ओतून ते ओले ठेवल्यामुळे दरवाजे पेटले नाहीत. तरुणांनी लाठ्यांचा मार देत आणि जमावाला वाड्यापासून दूर हटवत जवळील मोकळ्या बखळीमध्ये नेले. तेथे तरुणांची काँग्रेसी गुंडांशी धुमश्चक्री चालू झाली. साधारण रात्री १० वाजता काँग्रेसी गुंडांच्या ध्यानात आले की, वाडा जाळणे आपल्याला शक्य होणार नाही. तेव्हा काँग्रेसी जमाव पांगला आणि पळून गेला. कुटुंबातील आठही तरुण जबरदस्त घायाळ झाले होते.
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29215729/Adv_Purushottam_Daware.png)
माझे वडील अधिवक्ता पुरुषोत्तम यांच्या डोक्याला ९ ठिकाणी जखमा होऊन ते बेशुद्ध पडले होते. त्यामुळे तात्काळ ॲम्ब्युलन्स बोलावून घेतली. ॲम्ब्युलन्समधील परिचारकांनी माझ्या वडिलांसह इतर जखमींवर प्रथमोपचार केले आणि त्या सर्वांना ससून रुग्णालयात स्थलांतरित केले; परंतु माझ्या वडिलांनी विश्वासरावांनी घर सोडून रुग्णालयात जाण्यास नकार दिला; कारण काँग्रेसी गुंडांचे आक्रमण पुन्हा होईल, असा त्यांचा अंदाज होता.
२. विश्वासराव यांनी ‘वर्णाश्रम स्वराज्य संघ’ आणि रा.स्व. संघ यांना दिलेल्या सूचना
त्याच सुमारास मुंबई प्रांतात सर्वत्र ब्राह्मणांचे शिरकाण मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या बातम्या समजत होत्या. आर्य समाजाची मुंबई इलाख्यातील शाखा ‘वर्णाश्रम स्वराज्य संघ’ या संस्थेचे विश्वासराव अध्यक्ष होते. घरे जाळण्यासाठी वा आक्रमण झाल्यास प्रतिकार कसा करावा इत्यादी सूचना त्यांनी संस्थेच्या ठिकठिकाणच्या शाखांना रवाना केल्या. रा.स्व. संघाचे सरसंघचालक पू. गोळवलकरगुरुजी यांना एक तातडीचा निरोप विश्वासरावांनी पाठवला. त्यांनी त्यांनी ‘संघ कार्यक्षम स्वयंसेवकांची संघटना आहे. या कठीण प्रसंगी पीडितांच्या मागे संघ ठामपणे उभा राहिल्यास समाजाला दिलासा मिळून समाजविरोधी काँग्रेसी प्रवृत्तींना लगाम घालता येईल. तरी संघाने समाजविरोधी काँग्रेसी प्रवृत्तींच्या गुंडांपासून लोकांना त्वरित संरक्षण द्यावे’, असे लिहिले होते.
३. जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांना अहवाल पाठवणे आणि श्रीरंग पळसुले यांच्यासह ४ पहिलवानांनी घरी येणे
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/29215736/Dr_Shrirang_Palsule.png)
विश्वासराव यांनी डावरे वाड्यावर झालेल्या आक्रमणाचा अहवाल सिद्ध करून ‘पोलीस संरक्षण मिळावे’ म्हणून जिल्हाधिकारी आणि जिल्हा न्यायाधीश यांच्या नावे अर्ज सिद्ध करून पाठवला, तसेच डावरे वाड्याजवळच्या रामोशी गेट पोलीस चौकीवरही खबर पाठवली. त्यानंतर सकाळी पोलीस फौजदारांनी विश्वासरावांची भेट घेतली आणि त्यांनी संरक्षणासाठी ४ पोलीस लगेच तैनात केले; परंतु त्यांनी जातांना दबक्या आवाजात त्यांनी विश्वासरावांना सांगितले, ‘पोलिसांवर विसंबू नये.’ समाजविरोधी संघटनांना काँग्रेसी राजकीय नेतृत्वाचे साहाय्य असल्यामुळे त्यांचा पोलीसदलांवर असलेला दबाव विश्वासरावांच्या लक्षात आला.
४. श्रीरंग पळसुले आणि त्यांचे ४ कुस्तीगीर सहकारी यांनी विश्वासरावांना संरक्षणासाठी आश्वस्त करणे
विश्वासरावांचे एक स्नेही डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांचा बंगला टिळक रस्त्यावर होता. त्यांचे एक चिरंजीव श्रीरंग कलकत्याच्या होमिओपॅथी कॉलेजमध्ये शिकण्यास जाण्यापूर्वी कुस्त्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मिरजेमध्ये काही दिवसांसाठी गेले होते. योगायोगाने श्रीरंग त्यांच्या ४ कुस्तीगीर सहकार्यांसह त्याच दिवशी, म्हणजेच ३१ जानेवारी १९४८ या दिवशी सकाळी मिरजेहून रेल्वेने पुण्यास आले होते. रेल्वेस्थानकावरच त्यांना समजले की, गांधी हत्येनंतरच्या हिंसक जाळपोळीमुळे पुणे शहराच्या बर्याच भागांत विशेषतः टिळक रस्त्यावर संचारबंदी (कर्फ्यू) लागू केलेली होती. भवानी पेठेमध्ये संचारबंदी नव्हती आणि डावरे कुटुंबाशी असलेला परिचय लक्षात घेऊन श्रीरंग आणि त्यांचे ४ सहकारी आमच्या घरी आले. परिस्थितीचा आढावा घेऊन श्रीरंग विश्वासरावांना म्हणाले, ‘आप्पा, तुम्ही काही काळजी करू नका. माझे चारही सहकारी उत्तम पहिलवान आहेत. आम्ही सर्वजण जिवाची बाजी लावून तुम्हा सगळ्यांचे आणि वाड्याचे रक्षण करू.’ जणू काही परमेश्वरानेच श्रीरंग आणि त्यांच्या सहकार्यांना आमच्या साहाय्यासाठी पाठवले होते.
५. दुसर्यांदा झालेल्या आक्रमणाच्या वेळी करण्यात आलेला प्रतिकार
![](https://static.sanatanprabhat.org/wp-content/uploads/sites/3/2025/01/16222111/2024_april_Vinayak_Davray_C.jpg-new.jpg)
३१ जानेवारी या दिवशी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साधारण १०० काँग्रेसी गुंडांच्या जमावाने वाड्यावर दुसर्यांदा आक्रमण केले. या वेळी जळत्या पलित्यांशिवाय त्यांच्याजवळ लाठ्या आणि शिड्याही होत्या. पोलीस फौजदाराने विश्वासरावांना कल्पना दिल्यानुसार संरक्षणासाठी तैनात केलेले पोलीस निष्क्रीय होते. काँग्रेसी गुंडांनीही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले; परंतु श्रीरंग आणि त्यांचे सहकारी हातात लाठ्या घेऊन काँग्रेसी गुंडांच्या जमावावर अनपेक्षितरीत्या तुटून पडले. काँग्रेसी गुंडांनी मोक्याच्या जागी शिड्या लावून वाड्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. ते वर पोचताच त्यांना घरातील स्त्रिया काठ्यांच्या साहाय्याने शिड्या ढकलून देत होत्या आणि जरी एखादा गुंड वर पोचलाच, तर त्याच्या डोळ्यात तिखट पडत होते. त्यामुळे थोड्याच वेळात काँग्रेसी गुंडांनी शिड्यांचा मार्ग सोडून दिला. वीरश्रीने लाठ्या चालवणार्या पहिलवानांपुढे काँग्रेसी गुंडांचा टिकाव लागेना. तेवढ्यात गोकुळ वस्ताद तालमीकडून ४-५ पहिलवान हातात लाठ्या घेऊन वाड्याच्या दिशेने येतांना दिसले. परिणामी काँग्रेसी गुंडांचा जमाव पळू लागला आणि काही मिनिटांतच पांगला गेला.
यानंतर विश्वासरावांनी श्रीरंग आणि सहकार्यांचे कौतुक करत असतांनाच गोकुळ वस्ताद तालमीच्या पहिलवानांनाही शाबासकी दिली. पहिलवानांनीही विश्वासरावांना खात्री दिली, ‘आम्ही जवळपास राहून वाड्यावर नजर ठेवू आणि वेळ पडल्यास तात्काळ साहाय्यासाठी येऊ.’ विश्वासराव गोकुळ-वस्ताद तालमीचे विश्वस्त होते आणि तेथील अनेक पहिलवानांना आप्पांनी स्वतः शारीरिक प्रशिक्षण दिलेले होते. विश्वासरावांनी वाड्यावरील दुसर्या आक्रमणाचाही अहवाल सिद्ध करून पोलीस संरक्षणाची पुनःश्च मागणी करणारे अजून एक पत्र तातडीने सिद्ध केले आणि ते पत्र श्रीरंग पळसुले यांनी स्वतः जिल्हाधिकारी अन् जिल्हा न्यायाधीश यांच्याकडे नेऊन दिले.
६. वाड्यावर तिसर्यांदा आक्रमण होणे आणि भारतीय सैन्याच्या आगमनामुळे काँग्रेसी गुंडांनी पलायन करणे
डावरे वाडा काँग्रेसी समाजकंटकांच्या नजरेमध्ये सलत होता. रात्री ९ वाजता वाड्यावर तिसरे आक्रमण झाले. या वेळी ‘आज वाडा जाळायचाच’, या इराद्याने साधारण १५० काँग्रेसी गुंडांचा जमाव आला होता. त्यांच्याजवळ जळते पलिते, लाठ्या, शिड्या आणि दगडही होतेच, तसेच एक ‘फ्लेम थ्रोअर’ (जळता द्रवपदार्थ टाकण्यासाठी वापरण्यात येणारे उपकरण) होता. ते केवळ सैन्याजवळ असत. श्रीरंग आणि त्यांचे ४ सहकारी लाठ्या घेऊन प्रतिकारास वाड्याबाहेर पडले. घरातील स्त्रियांनी सर्व दरवाजे पाण्याने भिजते ठेवले आणि अधिक जोमाने शिड्या ढकलून देण्यास प्रारंभ केला. तिखटाची भुकटीही कामास येत होती; परंतु हा सर्व प्रतिकार १५० काँग्रेसी गुंडांच्या जमावापुढे विशेषतः ‘फ्लेम थ्रोअर’पुढे कमी पडत होता. जमावाने दगडफेकही चालवली होती. मुलांना तेवढेच काम मिळाले, ते जोमाने दगडांची परतफेक करत होते. तेवढ्यात गोकुळ वस्ताद तालमीचे पहिलवान आल्याने काँग्रेसी गुंडांच्या जमावाचा जोर न्यून झाला. त्याच सुमारास मंडईच्या दिशेने काँग्रेसी गुंडांनाही कुमक आली. नव्या दमाचे गुंड आल्यामुळे सर्व काँग्रेसी जमावाला चेव येऊन आक्रमण वाढले. एका दरवाजाने पेट घेतला. काँग्रेसी गुंड केव्हाही वाड्यात शिरले असते. तेवढ्यात दुरून बिगुल वाजण्याचे आवाज ऐकू आले आणि त्यासह सैन्याच्या बँड पथकाचाही आवाजही ऐकू आला. काँग्रेसी गुंडांच्या जमावामध्ये घबराट निर्माण झाली आणि ‘डावरे यांनी सैन्य बोलावले आहे’, असे म्हणत घाईने काँग्रेसी गुंडांच्या जमावाची पळापळ झाली.
सैन्याच्या कमांडरने विश्वासरावांना अहवाल दिला, ‘जिल्हाधिकार्यांच्या विनंतीवरून सैन्याने शहर स्वतःच्या कह्यात घेतले आहे. तुम्ही सुरक्षिततेची मुळीच काळजी करू नये. यापुढे कायदा आणि सुव्यवस्था यांचे दायित्व सैन्याकडे आहे.’ धर्मवीर विश्वासराव यांचे पत्र श्रीरंग पळसुले यांनी जिल्हाधिकार्यांना समक्ष नेऊन दिल्याचा उपयोग झाला होता. समाजविरोधी काँग्रेसी गुंडांचे ३ आक्रमणे परतवून डावरे वाडा ताठ मानेने उभा होता. धर्मवीर विश्वासराव, डावरे कुटुंबीय, श्रीरंग पळसुले, त्यांचे सहकारी आणि गोकुळ वस्ताद तालमीचे पहिलवान यांच्या धैर्याला तोड नाही. प्रतिकार करून वाडा जाळू न दिल्याचे त्या वेळेचे बहुतेक ते एकमेव उदाहरण असावे.
– विंग कमांडर विनायक पु. डावरे (निवृत्त), पुणे. (२३.१.२०२५)