FIR Against Journalist Rana Ayyub : महिला पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा न्यायालयाचा आदेश

हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान केल्याचे प्रकरण

पत्रकार राणा अय्यूब

नवी देहली – देहलीतील साकेत न्यायालयाने महिला पत्रकार राणा अय्यूब यांच्यावर गुन्हा नोंदवण्याचा आणि चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. राणा अय्यूब यांनी हिंदूंच्या देवता आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ‘एक्स’वर केलेल्या अवमानकारक पोस्टवरून हा आदेश दिला. अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी केलेल्या तक्रारीवरून न्यायालयाने हा आदेश दिला. पोलिसांत तक्रार केल्यानंतर अन्वेषण करण्यात पोलीस निष्क्रीय राहिल्याने अधिवक्त्या सचदेवा यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली होती.

१. न्यायालयाने निरीक्षण नोंदवले की, भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ (द्वेषयुक्त भाषण), २९५ अ (धार्मिक भावना दुखावणारे) आणि ५०५ (सार्वजनिक त्रासदायक विधाने) अंतर्गत गुन्हा नोंदवून चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

२. अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी देहली पोलिसांच्या सायबर सेलकडे माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ अ अंतर्गत तक्रार नोंदवली होती. यात म्हटले होते की, अय्यूब यांच्या पोस्टमध्ये हिंदूंच्या देवतांचा अपमान करण्यात आला आहे आणि भारतविरोधी भावना पसरवण्यात आल्या आहेत. यात हिंदूंच्या श्रद्धांची पद्धतशीरपणे खिल्ली उडवण्याचा आणि त्यांना हीन लेखण्याचा, भारताचा अपमान करण्याचा आणि धार्मिक तेढ पसरवण्याचा प्रयत्न दिसून येतो.

संपादकीय भूमिका

  • केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणार्‍या देहली सरकारच्या निष्क्रीयतेमुळे अधिवक्त्या अमिता सचदेवा यांना न्यायालयात यासाठी धाव घ्यावी लागली, हे लक्षात घ्या !
  • मुसलमान राणा अयूब यांनी हिंदूंच्या देवतांचा अवमान केल्यावर पोलीस निष्क्रीय रहातात; मात्र हिंदूंनी चुकून मुसलमानांचा धार्मिक भावनांचा कथित अवमान केला असता, तर पोलीस असेच निष्क्रीय राहिले असते का ?
  • अशांवर केवळ गुन्हा नोंदवून थांबू नये, तर त्यांना तात्काळ अटक करून आजन्म कारागृहात ठेवण्याची शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत !