महाराष्ट्र हा शिव-शंभूंना मानणार, औरंगजेबावर बंदीच हवी ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

रवंजा (जि. जळगाव) येथे हिंदु राष्ट्र जागृती व्याख्यानाचे यशस्वी आयोजन !

व्याख्यानाला उपस्थित धर्मप्रेमी महिला

जळगाव – महाराष्ट्र हा छत्रपती शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांना आदर्श मानणारा आहे. त्यांच्या चरित्राची पारायणे आज अनेक गावांत युवक करतांना दिसतात; पण मागील काही वर्षांत औरंगजेबाचे हेतुपुरस्सर उदात्तीकरण करण्याचे पेव फुटलेले आढळून येते. क्रूरकर्मा औरंगजेब याने हिंदूंची मंदिरे तोडली, हिंदु महिलांवर अत्याचार केले, लक्षावधी हिंदूंच्या कत्तली केल्या, धर्मवीर शंभूराजे यांची क्रूरपणे हत्या केली. अशा खुनी औरंगजेबाला महाराष्ट्रात थारा नाही. ज्याप्रमाणे इसिस, लादेन हे जिहाद करत आहेत, तसेच औरंगजेबाने तेव्हा केले आहे. त्यामुळे औरंगजेबाचे कापडी फलक फडकावण्यास राज्यात बंदी घालायला हवी, अशी परखड मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर यांनी केली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रवंजा (ता. एरंडोल, जि. जळगाव) येथे आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र जागृती व्याख्यानात ते बोलत होते. या व्याख्यानाला श्री. जुवेकर यांच्यासह समितीच्या नाशिक जिल्हा समन्वयक कु. रागेश्री देशपांडे यांनी धर्माचरणाचे महत्त्व विशद केले.

व्याख्यानाचा आरंभ हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन करून झाला. समितीच्या २२ वर्षांच्या कार्याची यशस्वी घोडदौड समितीचे सह जिल्हा समन्वयक श्री. विनोद शिंदे यांनी मांडली. व्याख्यानाला गावाचे सरपंच श्री. नामदेव माळी, पोलीस पाटील सौ. शर्वरी चौधरी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. व्याख्यानाला लाभ ८०० हून अधिक धर्मप्रेमींनी घेतला.

वैशिष्ट्यपूर्ण

१. व्याख्यानाचा प्रसार करण्यासाठी गावात आयोजित निमंत्रण फेरीत १०० हून अधिक धर्मप्रेमी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

२. व्याख्यानाला महिलांची उपस्थिती लक्षणीय, म्हणजे जवळपास ४०० हून अधिक होती. सर्व महिला घरातील स्वयंपाक लवकर करून व्याख्यानाला पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या होत्या.

३. व्याख्यानासाठी गावातील धर्मप्रेमी बांधवांनी व्यासपीठ, तंबू, ध्वनी, दिवे, तसेच विद्युत जनित्र आदी सर्व साहित्य धर्मसेवा म्हणून उपलब्ध करून दिले.

४. व्याख्यान झाल्यावर लगेचच गावातील धर्मप्रेमी युवकांनी सरपंचांकडे गावात ‘हिंदु राष्ट्र – रवंजा’ असा वार्ताफलक बनवण्याची अनुमती मागितली आणि येत्या शिवजयंतीला असा वार्ताफलक गावात सिद्ध करण्याचा निश्यच केला.

हिंदु राष्ट्र नियोजन बैठकीचे आयोजन !

व्याख्यानाला आलेल्या धर्मप्रेमींचे हिंदु राष्ट्राच्या कार्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यासाठी समितीच्या वतीने २९ जानेवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता गावातील श्री मारुती मंदिरात हिंदु राष्ट्र नियोजन बैठक आयोजित करण्यात आलेली आहे. या बैठकीला अधिकाधिक धर्मप्रेमी बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.