प्रयागराज – महाकुंभपर्वाविषयी पाकिस्तानसह इस्लामी देशांमध्ये मोठी उत्सुकता असल्याचे नुकतेच दिसून आले. पाकिस्तानमध्ये गेल्या काही दिवसांपासून गूगलवर महाकुंभाशी संबंधित माहिती मोठ्या प्रमाणात शोधली जात असल्याचे उघड झाले. पाकिस्ताननंतर कतार, संयुक्त अरब अमिरात आणि बहरीन यांसारख्या देशांमध्येही महाकुंभाविषयी मोठी रुची दिसून येत आहे.
प्रयागराज येथे महाकुंभपर्वास आरंभ झाला असून देश-विदेशांतील भाविक मोठ्या संख्येने यात सहभागी होत आहेत. ब्राझिल, जर्मनी, जपान, इंग्लंड, अमेरिका, स्पेन यांसारख्या देशांतील भाविक प्रयागराजमध्ये येत आहेत. महाकुंभातील आंतरराष्ट्रीय भाविकांची वाढती संख्या सनातन संस्कृती आणि भारतीय आध्यात्मिक परंपरांची जागतिक स्तरावर वाढती लोकप्रियता दर्शवते.