वाल्मिक कराडवर मकोका; समर्थकांकडून ‘परळी बंद’ची हाक !

बीड – २ कोटीच्या खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला केज न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर कराड याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याविषयीचे वृत्त बीडमध्ये पोचताच ‘परळी बंद’ची हाक देत समर्थकांनी रस्त्यावर येऊन टायर पेटवून या गोष्टीचा निषेध केला. त्यामुळे परळी शहरात कडकडीत बंद होता.

सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात ‘मास्टरमाईंड’ असल्याचा आरोप असलेल्या वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत गुन्हा नोंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

मकोका अंतर्गत गुन्हा नोंद झाल्याने आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता अल्प आहे. या कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. त्यामुळे कराडला विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज करावा लागतो. विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे.