Yogi Cabinet Meeting At Mahakumbh : संगमक्षेत्री १६ किंवा २१ जानेवारीला होणार राज्य मंत्रीमंडळाची बैठक !

मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री त्रिवेणी संगमात करणार स्नान !

प्रयागराज – येथील संगमक्षेत्री राज्य मंत्रीमंडळाची बैठक मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखाली १६ किंवा २१ जानेवारी या दिवशी होणार आहे. त्या वेळी मुख्यमंत्र्यासह सर्व मंत्री संगमात स्नान करणार आहेत. गंगा नदीवर हेतापट्टी ते दारागंज या दरम्यान असलेल्या प्रस्तावित पुलाच्या ठिकाणी ही बैठक होण्याची शक्यता आहे. या ठिकाणाला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. या प्रस्तावित पुलाच्या बांधकामासाठी ७५० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले असून मंत्रीमंडळाच्या बैठकीत या प्रकल्पाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
वर्ष २०१९ मध्ये झालेल्या अर्धकुंभाच्या कालावधीत संगमक्षेत्री अशाच प्रकारे राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली होती, त्यात गंगा द्रुतगती महामार्गाच्या प्रकल्पाला संमत्ती देण्यात आली होती.

संगमाजवळ प्रतिकात्मक रामसेतू निर्माण करणार !

यमुना नदीवरील बोट क्लब ते अरैल या दरम्यान प्रतिकात्मक रामसेतू निर्माण करण्यात येणार असून या प्रकल्पालाही मान्यता मिळण्याची शक्यता आहे. प्रयागराजच्या महापौरायंनी हा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.