नागा साधूंविषयी थोडेसे..!

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे चालू होणार्‍या महाकुंभपर्वानिमित्त…

‘नागा साधू हे कुंभपर्वाची प्रतिष्ठा असतात. सर्वसामान्य भाविकांना या नागा साधूंविषयी फारशी माहिती नसते, किंबहुना काहीच माहिती नसते. भाविकांना केवळ कुंभपर्वातच नागा साधूंचे दर्शन होते. त्यांचे रहाण्याचे ठिकाण, त्यांची दिनचर्या आदींविषयी सर्वांनाच कुतूहल असते.

१. ‘नागा’ शब्दाची व्याख्या

नागा साधूचे संग्रहित छायाचित्र

‘नागा’ हा शब्द संस्कृतमधून आला आहे. नागा, म्हणजे ‘पर्वत.’ पर्वतावर रहाणार्‍या लोकांना ‘नागा’ म्हणतात. कच्छरी भाषेत नागा, म्हणजे ‘तरुण शूर सेनानी.’ त्याच वेळी नागा, म्हणजे ‘नग्न’, असेही मानले जाते. हा केवळ एक अर्थ आहे. नागा म्हणजे ‘नग्न असणे’, असे नाही.

२. प्राचीन काळापासून अस्तित्व

‘नागा’ हा शब्द भारतीय समाजात प्राचीन काळापासून प्रचलित आहे. आपल्याकडे ‘नागवंश’ आणि ‘नागा’ जातीचा उल्लेख आहे. देशात तर ‘नागा’ नावाने ‘नागालँड’ नावाचे राज्यही आहे. इतिहास जाणून घेतल्यास नागवंशी, नागा आणि दशनामी पंथ यांचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. असे मानले जाते की, नाग, नाथ आणि नाग परंपरा या गुरु दत्तात्रेयांच्या परंपरेच्या शाखा आहेत.

३. स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे करतात पिंडदान !

नागा साधू बनणे सोपे नसते. त्यासाठी अनेक वर्षांची तपश्चर्या लागते. सर्व आखाडे आपापल्या साधूंना नागा साधूंची दीक्षा देतात. काही नागा साधूंना ‘भुट्टो’ म्हणतात. सर्वप्रथम नागा साधूंना ब्रह्मचारी रहाण्यास शिकवले जाते. ब्रह्मचर्य व्रत शिकण्यासाठी किमान १२ वर्षे लागतात. यानंतर त्यांचा यज्ञोपवीत संस्कार होतो. नागा साधू स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचे पिंडदान करतात. त्याला ‘बिजवान’ म्हणतात. त्यानंतर त्यांना घर असते, ना संपत्ती. ते भूमीवर झोपतात. नागा साधू सर्वसामान्यांप्रमाणे लोकांमध्ये रहात नाहीत, ते निर्जन ठिकाणी रहातात. काही नागा साधू लंगोट घालतात, काही साधू कपडे घालत नाहीत. ते अंगावर भस्म लावतात. ते एका दिवसात केवळ ७ घरांत भिक्षा मागू शकतात. ते दिवसातून एकदाच अन्नग्रहण करतात. सर्वांत विशेष म्हणजे ते शस्त्रे चालवण्यात पारंगत असतात. जुना आखाड्यात नागा साधूंची सर्वाधिक संख्या आहे. नागा साधूंकडे अनेक अद्भुत शक्ती आहेत, असे मानले जाते, जिचा वापर ते केवळ लोककल्याणासाठीच करतात. नागा साधूंच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत, तर सिद्धयोगाच्या मुद्रेत बसवून त्यांना भूसमाधी दिली जाते.’

(संदर्भ : संकेतस्थळ)