जागतिक लोकसंख्येचा विचार करता हिंदू हे ख्रिस्ती आणि मुसलमान यांच्यापेक्षा अल्प आहेत. असे असले, तरी जगातील सर्वांत मोठ्या धार्मिक एकत्रीकरणाचा उत्सव हा हिंदूंचा आहे. वैशिष्ट्यपूर्ण आणि दैवी महती असलेला हा उत्सव म्हणजे कुंभमेळा ! कोणत्याही प्रकारच्या लोकांच्या एकत्रीकरणाच्या निमित्तांचा विचार करता एका आठवड्याने चालू होणार्या प्रयागराज महाकुंभ मेळ्याला यंदा जगातील सर्व देशांचे मिळून ४५ कोटी लोक येतील, असा अनुमान वर्तवला जात आहे. प्रतिवर्षी मक्केला भरणार्या हजयात्रेला वर्षभरात अधिकाधिक २ कोटी लोक भेट देतात. यातून असे म्हणता येईल की, २१ व्या शतकात जेवढ्या मुसलमानांनी मक्केला भेट दिली, तेवढे लोक हिंदूंच्या कुंभमेळ्याला १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीत भेट देणार आहेत. प्रत्येक ४ वर्षांनी येणार्या ऑलिंपिकचा म्हणजे ‘खेळांच्या महाकुंभा’चा विचार करता नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिंपिकला १ कोटीहूनही अल्प लोकांनी भेट दिली. यातून प्रयागराज महाकुंभाच्या विस्ताराचा अनुमान येऊ शकेल.
कुंभमेळ्याचा इतिहास बहुतेकांना ठाऊक आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध हिंदु लेखक नीलेश ओक या संदर्भात सांगतात की, गुरु ग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला १२ वर्षे लागतात. कुंभमेळ्याचा गुरुग्रहाशी थेट संबंध असल्याकारणाने पूर्ण कुंभ हा तपातून एकदा होत असतो. चंद्र, सूर्य आणि गुरु या तिघांच्या हालचालींचा एकत्रित विचार करता आपण इतिहासाच्या नेमक्या घटिकेपर्यंत सहज पोचू शकतो. याचाच विचार करून भारतीय सभ्यतेच्या अतीप्राचीनतेची कालगणना करता येते आणि या प्राचीन भारतीय धर्माचा कुंभमेळा हा अविभाज्य घटक होय. सनातन हिंदु धर्माच्या निरंतरतेची साक्ष म्हणजेच कुंभमेळा !
विदेशी ‘हिंदू’ !
अशी एक मान्यता आहे की, कुंभपर्वाच्या वेळी वैश्विक आध्यात्मिक ऊर्जा प्रयागराज येथे एकत्रित होते आणि सर्वांचे शरीर, मन आणि आत्मा शुद्ध करते. सहस्रावधी विदेशी लोकांचीही केवळ शरिरेच नाही, तर श्रद्धा आणि भक्ती यांनी ओतप्रोत भरलेली त्यांची हृदयमंदिरेही कुंभपर्वात न्हाऊन निघत असतात. प्रसिद्ध जर्मन लेखिका मारिया वर्थ या कुंभमेळ्यातून हिंदु धर्म आणि भारत यांकडे आकर्षित झालेल्या सांप्रतकाळातील एक मोठे ज्ञात उदाहरण
होय ! वर्ष १९८० मध्ये स्वत:च्या तरुण वयात जर्मनीतून ऑस्ट्रेलियाला निघालेली मारिया काही दिवसांसाठी भारतात आली होती. दैवाने त्या वेळी हरिद्वारमध्ये कुंभमेळा चालू होता. त्याला या जर्मन युवतीने भेट दिली आणि तेथील ऋषितुल्य संत-महात्म्यांच्या सत्संगाने ती न्हाऊन निघाली. एवढे की, ती ऑस्ट्रेलियाला पुढे कधी गेलीच नाही, तर कायमची भारताची होऊन गेली. हिंदु धर्मातील उपासना पद्धती आणि अध्यात्म यांनी मारिया वर्थ एवढ्या भारावून गेल्या की, हिंदूंचा साधनापथ स्वीकारण्यासह हिंदु धर्मप्रचाराला त्यांनी स्वत:चे जीवितकार्य बनवले. तलवारी अथवा आमिषांच्या जोरावर मानवसमुहाला स्वत:च्या पंथात ओढणार्यांपुढे हिंदु धर्माचा महिमा अशा उदाहरणांमधून अधिकच झळाळून निघतो.
सर्वांत प्राचीन नि ईश्वरनिर्मित हिंदु धर्माचे प्रतीक असलेला महाकुंभ हा सहस्रावधी वर्षांमध्ये झालेल्या आक्रमणांना पुरून उरला आहे. हिंदु धर्माचा अत्यंत डोळसपणे अभ्यास करणारे प्रसिद्ध फ्रेंच पत्रकार फ्रान्सुआ गोतिए सांगतात की, आजही जागतिक आशा-आकांक्षा त्यागलेले सहस्रावधी हिंदु साधू-संत भारतात आहेत आणि ते कुंभपर्वाचा लाभ घेण्यासाठी नि साधना करण्यासाठी येथे जमतात. अलेक्झांडरपासून औरंगजेबापर्यंत हिंदूंवर सहस्रावधी आक्रमणे झाली, तरीही कुंभमेळ्याची गंगा अव्याहत वहात राहिली.
हिंदूंच्या समाधानाचे व्यासपीठ !
गोतिए यांनी उपस्थित केलेले हे सूत्र कळीचे आहे. कोणत्याही सभ्यतेचा श्वास हा शास्त्र आणि शस्त्र यांवर आधारित असतो. हिंदु धर्माचा विचार करता त्याला अनुक्रमे ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज या दैवी सूत्रांत गुंफता येईल. हिंदूंवरील आक्रमणांना परतवून लावण्यासाठी कुंभमेळ्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. नागा साधू हे ब्राह्म तेजासह क्षात्रतेजाचे प्रतीक राहिले आहेत. वेगवेगळ्या उपासनापद्धती नि उपास्यदेवता असलेले साधू-संतांचे आखाडे यांचे योगदानही अमूल्य राहिले आहे. गेल्या ४०-५० वर्षांत श्रीरामजन्मभूमी आंदोलनाला जी बळकटी मिळाली, त्यामध्ये कुंभमेळ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. वर्ष १९८६ येथील हरिद्वार कुंभमेळ्यात झालेल्या धर्मसंसदेद्वारे या आंदोलनाने गती पकडली. वर्ष २०१९ मधील हरिद्वारच्या कुंभमेळ्यातही धर्मसंसद आणि आंदोलने यांद्वारे श्रीराममंदिराच्या उभारणीसाठी हिंदूंनी निर्णायक दबाव निर्माण केला होता. त्यामुळेच साडेपाचशे वर्षांनंतर अयोध्येत प्रभु श्रीरामचंद्रांची गेल्या २२ जानेवारीला स्थापना झाली.
यंदा प्रयागराज येथे होणार्या महाकुंभात हिंदूंसमोर ‘आ’ वाचून उभ्या असलेल्या प्रश्नांशीही दोन हात झाले पाहिजेत. राष्ट्रव्यापी कठोर ‘लव्ह जिहाद कायद्या’ची नितांत आवश्यकता हिंदु जगत जाणते. याखेरीज वक्फ कायद्याच्या राक्षसी कचाट्यापासून हिंदूंची भूमी नि भारतभूमी संरक्षित करण्यासाठीही कंबर कसली गेली पाहिजे. या दृष्टीकोनातून हिंदु समाजाला जागृत करण्यासाठी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या संस्थेच्या नेत्रदीपक फलकांनी बिगुल वाजवले आहे. हिंदूंच्या पवित्र श्रद्धेला कस्पटासमान लेखून नि पायदळी तुडवून म्लेंच्छ राजांनी आमची सहस्रावधी मंदिरे पाडली. त्यांची कथित प्रार्थनास्थळे हिंदूंवरील गेल्या १ सहस्र वर्षांच्या इतिहासातील अत्याचारांची प्रतिके आहेत. त्यांच्यावर घटनात्मक हातोडा पडण्यासाठी धर्माधिष्ठान आवश्यक आहे. बांगलादेशात हिंदु धर्मावर हिरवी छाया अधिक गडद होत चालली आहे. ‘इस्कॉन’चे सदस्य चिन्मय दास प्रभु यांना झालेल्या अन्याय्य अटकेपासून गेल्या ५ महिन्यांत हिंदूंवर झालेल्या ६ सहस्रांहून अधिक आक्रमणांना साधू विसरू शकत नाहीत. हिंदु धर्माच्या रक्षणार्थ स्वत:चे सर्वस्व पणाला लावलेल्या साधूंच्या या प्रयागराज महाकुंभात त्या दिशेनेही मागण्या, नीती, धोरण, दिशा नि आराखडा आखला गेला पाहिजे. महाकुंभात १० सहस्रांहून अधिक आध्यात्मिक आणि राष्ट्रप्रेमी संस्था सहभागी होत आहेत. हिंदूसंघटनाच्या या महासागरात संत-महंत यांचे वैचारिक मंथन होईल. कुंभमेळ्याच्या रूपाने हा जागतिक मंच हिंदु पुनरुत्थानाचे एक शक्तीशाली प्रतीक सिद्ध होवो नि त्यातून ‘हिंदु पुनरुत्थान’ आणि ‘हिंदु राष्ट्र’रूपी अमृत सिद्ध होण्यासाठी हिंदु समाजाला बळ मिळो. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमावरील तीर्थांचा राजा प्रयागराज येथे १४४ वर्षांनंतर होणार्या महाकुंभ पर्वाद्वारे हिंदु धर्माच्या शाश्वत कवचाची परंपरा अखंडित वहात राहो !
हिंदूंवरील अत्याचारांना वाचा फुटून निर्णायक दिशा देणारे हिंदूसंघटन महाकुंभ पर्वाद्वारे सिद्ध होवो, ही अपेक्षा ! |