
महाराष्ट्रातील ‘शिवधर्म फाऊंडेशन’ या संस्थेने महापुरुषांचा अवमान रोखण्यासाठी आणि त्यातही छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा होणारा अवमान रोखण्यासाठी राज्यात कार्यरत ‘संभाजी ब्रिगेड’ नावाच्या संघटनेचे नाव पालटण्याची मागणी केली आहे. ‘शिवधर्म फाऊंडेशन’चे संस्थापक दीपक काटे यांनी सांगितले, ‘संभाजी ब्रिगेडच्या नावातून छत्रपती संभाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख होऊन त्यांचा अवमान होत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवभक्त आणि छत्रपती संभाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्यांच्या भावना दुखावल्या जात आहेत.’ दीपक काटे हे १८ मार्चपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आंदोलन करण्यासह मोर्चे काढणार आहेत. संभाजी ब्रिगेडने तिचे नाव न पालटल्यास या संघटनेची नोंदणीच रहित करण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे.
छत्रपती उदयनराजे यांनी दीपक काटे यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे. महापुरुषांचा एकेरी उल्लेख करण्यामागे निश्चितपणे त्यांना जाणीवपूर्वक न्यून लेखणे, हा उद्देश दिसतो. साम्यवादी इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा वीरश्रीयुक्त इतिहास शालेय पाठ्यपुस्तकांतून गायब केला. त्यांचा कथा, कादंबर्या यांमध्ये उल्लेख करतांना ‘शिवाजी’, ‘संभाजी’ असा एकेरी उल्लेख केला जातो. याद्वारे इतिहासातून त्यांचा पराक्रम पुसण्यासह लोकांच्या मनातून त्यांचा सन्मानही पुसण्याचा साम्यवादी, पुरो(अधो)गामी, ब्रिगेडी विचारसरणीचे नेते यांचे षड्यंत्र लक्षात येते. कोल्हापूरच्या ‘शिवाजी विद्यापिठा’चा ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ नामविस्तार असो अथवा एखाद्या संघटनेचे नाव पालटण्याचा विषय असो, आता राष्ट्र आणि धर्म प्रेमी जागृत होत आहेत. राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक यांचा सन्मान कोणत्याही परिस्थितीमध्ये राखला जाणेच आवश्यक आहे.