Mahakumbh 2025: जुना आखाड्याच्या सहस्रो साधू-संतांचा नगरप्रवेश !

प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

सिद्ध समाधीबाबा शिवचेतन पुरीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शनासाठी जातांना श्री स्वामी अवधेशानंद गिरि जी महाराज

प्रयागराज, १४ डिसेंबर (वार्ता.) – येथे १३ जानेवारीपासून चालू होणार्‍या महाकुंभपर्वासाठी श्रीपंचदशनाम जुना आखाड्याच्या सहस्रो साधू-संतांनी १४ डिसेंबरला भव्य मिरवणुकीद्वारे (पेशवाईद्वारे) नगरप्रवेश आणि नंतर आखाडाप्रवेश केला. या प्रसंगी आखाड्याशी संबंधित सहस्रो मठ-मंदिरांतील साधू, संत, महंत आणि भाविक उपस्थित होते. या मिरवणुकीत नागा साधूंची विशेष उपस्थिती होती.

मिरवणुकीत सहभागी साधू-संत
नागा साधूंनी धरलेले आखाड्याचे निशाण

दत्त जयंतीच्या मुहुर्तावर जुना आखाड्याकडून श्री दत्तात्रेयांच्या पादुका घेऊन संगम मार्गाद्वारे नगरप्रवेश केला. या मिरवणुकीत १०० हून अधिक रथांचा समावेश होता. सर्व रथांवर आकर्षक सजावट केली होती. सर्वांत पुढे नागा साधूंनी आखाड्याचे निशाण धरले होत. यासह आखाड्याचे मोठे ध्वजही धरण्यात आले होते. त्यामागे श्रीपंचदशनाम जुना आखाड्याचे आचार्यमहामंडलेश्‍वर अनन्तविद्याविभूषित श्री स्वामी अवधेशानंद गिरि जी महाराज यांचा मयुर रथ होता. त्या पाठोपाठ श्री महंत, महामंडलेश्‍वर, साधू आदींचे रथ होते. ही मिरवणूक त्रिवेणी मार्गावरील जुना आखाड्याजवळ आल्यानंतर स्वामी अवधेशानंद गिरि जी महाराज यांनी सिद्ध समाधीबाबा शिवचेतन पुरीजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. या मिरवणुकीने पारंपरिक वाद्यांसह ढोल-ताशाच्या गजरात नगरप्रवेश आणि आखाडाप्रवेश केला. या मिरवणुकीत नागा साधूंनी तलवारीसह अन्य शस्त्रांचे प्रदर्शन केले. मुख्य रथाच्या पुढे अनेक आखाड्याशी संबंधित अनेक साध्वी उपस्थित होत्या. या प्रसंगी पोलीस आणि प्रशासन यांच्या वतीने  श्री स्वामी अवधेशानंद गिरि जी महाराज यांचा सन्मान करण्यात आला. यासह रथांवर विविध ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली.