US Protest Against UNREST B’DESH : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात अमेरिकेत निदर्शने !

शिकागोच्या कॅरोल स्ट्रीममधील राणा रेगन सेंटर येथे हिंदू अमेरिकन शांततापूर्ण निदर्शने करतांना

शिकागो : बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात निदर्शने आता केवळ भारतापुरती मर्यादित राहिलेली नाहीत, तर जगभरात पसरू लागली आहेत.  अमेरिकेत लोकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. शिकागोच्या कॅरोल स्ट्रीम, इलिनॉय येथील राणा रेगन सेंटरमध्ये सुमारे ५०० भारतीय वंशाच्या अमेरिकी हिंदूंनी बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात शांततापूर्ण निदर्शने केली. याच आंदोलकांनी २ महिन्यांपूर्वी हिंदूंवरील हिंसाचाराच्या निषेधार्थ शांततापूर्ण मोर्चा काढला होता.

१. शिकागोच्या भारतीय-अमेरिकी गटाचे अध्यक्ष हरिभाई पटेल यांनी या वेळी  बांगलादेशात हिंदूंची मंदिरे कशी उद्ध्वस्त केली जात आहेत आणि हिंदूंची कशी हत्या केली जात आहे, याविषयी भाष्य केले.

२. शिकागो येथील हिंदुत्वनिष्ठ डॉ. राम चक्रवर्ती यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सध्याच्या स्थितीविषयी माहिती दिली. बांगलादेशात सैन्यदल आणि पोलीस हिंदूंचे अपहरण करून त्यांचे बलपूर्वक धर्मांतर करत असल्याचे त्यांनी सांगितले.

३. डॉ. रश्मी पटेल म्हणाल्या की, अमेरिकेतील हिंदूंनी राष्ट्राध्यक्षांना संदेश पाठवून त्यांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे की, बांगलादेशात चालू असलेला हिंसाचार हा हिंदूंचा सर्वांत मोठा नरसंहार आहे. या सूत्रावर अमेरिकेतील हिंदूंनी त्यांच्या  खासदारांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.