राहुरी (अहिल्यानगर) येथील शाळेतील शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा नोंद !

प्रतिकात्मक छायाचित्र

राहुरी (जिल्हा अहिल्यानगर) – शहरातील एका शाळेतील शिक्षक गणेश खांडवे यांनी भ्रमणभाषवर अश्लील चित्रीफीत दाखवणे, लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. एका पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार प्रविष्ट केली आहे.

तक्रारदाराच्या २ मुली आणि १ मुलगा या शाळेत शिक्षण घेत आहेत. यातील एका मुलाने आणि मुलीने आईला दूरभाष करून ‘शाळेतील खांडवे सर हे आमच्याशी वाईट वागतात. तू आम्हाला भेटायला ये’, असे सांगितले. त्या वेळी इतर मुलींनीही ‘खांडवे सर वाईट वागतात’, असे सांगितले. ‘हात धरून नको त्या ठिकाणी हात लावायला लावतात. भ्रमणभाषमधील अश्लील चित्रफिती दाखवतात. अनेक वेळा लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करायला लावतात’, अशा तक्रारी इतर मुलींनी पीडितेच्या आईकडे केल्या.

संपादकीय भूमिका

असे वासनांध शिक्षक मुलांना काय शिक्षण देणार ? शैक्षणिक क्षेत्रांमध्ये घडणार्‍या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते !