संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीड – मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात बीडच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात १० एप्रिल या दिवशी तिसरी सुनावणी झाली. या सुनावणीच्या वेळी या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याने ‘संतोष देशमुख हत्या प्रकरणातील खंडणीशी माझा काहीही संबंध नसून मी निर्दाेष असल्याने मला सोडून द्यावे’, अशी मागणी केली आहे. विशेष सरकारी अधिवक्ता उज्ज्वल निकम हे न्यायालयात उपस्थित राहून त्यांनी न्यायालयाकडे विनंती आवेदन प्रविष्ट केले आहे.

अधिवक्ता उज्ज्वल निकम म्हणाले की, हत्या प्रकरणी झालेल्या सुनावणीत मुख्य आरोपी वाल्मीक कराड याने न्यायालयात आवेदन प्रविष्ट केले आहे. यामध्ये त्याने वरील मागणी केली. आरोपींनी काही कागदपत्रेही न्यायालयाला मागितली होती. त्यानुसार सरकारी पक्षाच्या वतीने ती कागदपत्रे न्यायालयात देण्यात आली आहेत. संतोष देशमुख यांना मारहाण करतांनाचा आरोपींनी काढलेला व्हिडिओ न्यायालयात प्रविष्ट करण्यात आला आहे. तो आरोपींना देण्याआधी सुनावणी करण्याची विनंती मी न्यायालयाला केली आहे.