‘एकदा कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय १३ वर्षे) हिला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. तेव्हा त्यांच्यात झालेले संभाषण येथे दिले आहे.
१. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे स्मरण करत पाणी प्यायल्यावर पाणी गोड लागलेे आणि हा प्रयोग घरातील व्यक्तींना करायला सांगितल्यावर त्यांनाही तसेच वाटले’, असे कु. प्रार्थना पाठक हिने सांगणे
कु. प्रार्थना पाठक : परम पूज्य, आज मी एक प्रयोग करून पाहिला. मी पाणी पित होते. तेव्हा मी विचार केला, ‘तुमचे स्मरण करून पाणी पिईन.’ मी तुमचे स्मरण करत ‘परम पूज्य गुरुदेव, परम पूज्य गुरुदेव’, असे म्हणत पाणी प्यायले. तेव्हा ते पाणी मला फार गोड लागले; मात्र मी नेहमी पाणी पिते, तेव्हा ते गोड लागत नाही. मी माझ्या आई-बाबांना (पू. (सौ.) मनीषा पाठक आणि श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ४४ वर्षे) यांना) म्हणाले, ‘‘तुम्हीही असे करून पहा.’’ त्यानंतर त्यांनी असा प्रयोग केल्यावर त्यांनाही पाणी गोड वाटले.
परात्पर गुरु डॉ. आठवले : छान !
२. सनातनच्या ‘बोधकथा’ या ग्रंथातील सीता स्वयंवर या कथेतील ‘शिवधनुष्य आणि श्रीराम’ यांच्या संभाषणातून अहं निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येणे अन् अहं निर्मूलन करून गुरुदेवांच्या चरणी रहायचे असल्याची प्रेरणा कथेतून मिळणे
कु. प्रार्थना पाठक : बालसाधकांसाठी सनातनचा ‘बोधकथा’ नावाचा ग्रंथ आहे. त्यामध्ये एक प्रसंग आहे. त्यातून मला शिकायला मिळाले, ‘माझ्यात अहं नको.’ सीतास्वयंवराच्या वेळी श्रीराम धनुष्याला प्रत्यंचा चढवत असतांना शिवधनुष्य मोडले आणि त्याने ते खाली टाकले. तेव्हा श्रीराम आणि धनुष्य यांच्यात झालेल्या संभाषणातून मला पुष्कळ शिकायला म्हणाले.
श्रीराम म्हणाला, ‘आता तुला कसे वाटत आहे ?’ तेव्हा शिवधनुष्य म्हणाले, ‘पुष्कळ आनंद वाटत आहे. मला राक्षसाने उचलले असते, तर मी बंधनात अडकून पडलो असतो; परंतु तुम्ही मला मुक्त केले.’ त्यावर श्रीराम म्हणाला, ‘मी तर तुला भूमीवर टाकले, त्याचे काय ?’ तेव्हा धनुष्य म्हणाले, ‘आपल्या चरणीच टाकले ना ! मला तुमची चरणसेवा करण्याची संधी मिळाली.’ तेव्हा पुन्हा श्रीराम म्हणाला, ‘मी तुझे २ तुकडे केले. त्याचे काय ?’ तेव्हा शिवधनुष्य म्हणाले, ‘तुम्ही माझा अहंकार तोडून टाकला. तुम्ही माझा सर्व अहंकार दूर केल्याबद्दल मी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे.’
या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘माझ्यात अहं नको.’ ‘मला आता अहं निर्मूलन करायचे आहे आणि मला तुमच्या चरणीच रहायचे आहे’, अशी प्रेरणा मला या प्रसंगातून मिळाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : एवढी लहान आहे, तरीही या वयात ग्रंथ वाचते. किती मोठे लोक ग्रंथांचे वाचन करतात ?
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी कु. प्रार्थनाला प्रतिदिन मिठाई द्यायला सांगितल्यावर कु. प्रार्थनाने त्यांना ‘आपले दर्शनच माझ्यासाठी फार मोठा प्रसाद आहे’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुला कोणता खाऊ पाहिजे ? (असे मला विचारले आणि ते आईला म्हणाले) तिला प्रतिदिन मिठाई, खाऊ द्या !
कु. प्रार्थना पाठक : आपले दर्शनच माझ्यासाठी फार मोठा प्रसाद आहे.
तेव्हा परात्पर गुरु डॉ. आठवले आईला म्हणाले, ‘‘तिचे एकेक वाक्य कसे असते !’’