हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांच्या वर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

आळंदी (जिल्हा पुणे) येथील अधिवेशनात वारकर्‍यांचा ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा सत्कार झाल्यानंतर उपस्थित विविध मान्यवर

पुणे – महाराष्ट्राच्या विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीत प्रथमच हिंदूंनी जात-पात, संप्रदाय यांसह कशातच न अडकता हिंदु धर्मीय म्हणून हिंदुत्वाच्या सूत्रावर मतदान केले. जे हिंदु धर्माचे रक्षणकर्ते आहेत, अशांना सत्तेपर्यंत पोचवणे यालाच आजच्या काळातील ‘धर्मसंस्थापना’ म्हणता येईल. सद्यस्थितीत बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, त्यामुळे संकट आता आपल्या उंबरठ्यापर्यंत आले आहे. तरी यापुढील काळात हिंदूंनी सजग राहून जात-पात, संप्रदाय यांच्यावर येऊन राष्ट्र आणि धर्मकार्यासाठी हिंदुत्वाची वज्रमूठ सिद्ध करावी, असे आवाहन अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी केले. २६ नोव्हेंबर या दिवशी श्री देविदास धर्मशाळा तथा वै. मामासाहेब दांडेकर स्मृती मंदिर, गोपाळपुरा, आळंदी येथे १८ वे वारकरी महाअधिवेशन आणि धर्मसभा पार पडली. त्या प्रसंगी त्यांनी हे आवाहन केले. हिंदु जनजागृती समिती, राष्ट्रीय वारकरी परिषद आणि वारकरी संप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनात वारकर्‍यांनी ‘धर्मजागर’ करण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय वारकरी परिषेदेचे प्रवक्ते ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्लाळीकर यांनी रसाळ वाणीत केले.

आळंदी येथील वारकरी अधिवेशनात दीपप्रज्वलन करतांना विविध मान्यवर

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि पुढे म्हणाले, ‘‘समाजाला, देशाला तारून जाण्यासाठी, तसेच लोकांना जागवण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ हा एकच शब्द पुरे आहे. त्यामुळे मी ‘शिवचैतन्य जागरण यात्रा’ चालू केली आहे. महाराष्ट्रात गेल्या ७०० वर्षांपेक्षा अधिक काळ वारकरी संप्रदाय-संत परंपरा यांनी लोकांना जागृत करण्याचे मोठे कार्य केले आहे. पंतप्रधानांनी ‘वक्फ बोर्ड’ रहित करण्याची घोषणा दिल्यावर काही लोकांनी या विरोधात रस्त्यावर उतरून विरोध करण्याची सिद्धता केली. त्यामुळे हिंदूंनीही यापुढील काळात त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर देण्याची सिद्धता ठेवली पाहिजे, तसेच यापुढील काळात ‘हिंदू-हिंदू, भाई-भाई’ हीच घोषणा आपण दिली पाहिजे.’’

वारकरी महाअधिवेशनासाठी उपस्थित वारकरी, भाविक

मान्यवरांनी व्यक्त केलेले मनोगत

पू. अमृताश्रम स्वामी महाराज (दंडी स्वामी) म्हणाले, ‘‘स्वामी विवेकानंद यांनी ज्याप्रमाणे धर्मयोद्ध्याचे कार्य केले, त्याप्रमाणेच आज प.पू. स्वामी गोविंददेव गिरि कार्य करत आहेत. प.पू. निवृत्ती महाराज वक्ते बाबा यांनी हिंदुत्वासाठी पुष्कळ मोठे कार्य केले. या अधिवेशनातून प्रेरणा घेऊन आपण सर्वांनी धर्माचे कार्य करावे.’’ पालघर हिंदु शक्तीपीठाचे हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले, ‘‘गेली अनेक वर्षे आम्ही पालघरसारख्या भागातही हिंदुत्वाचे कार्य चालू ठेवलेले आहे. या अधिवेशनाच्या माध्यमातून सातत्याने धर्मजागृती करण्याचे प्रयत्न चालू आहेत.’’

ह.भ.प. जर्नादन महाराज मेटे

ह.भ.प. जनार्दन महाराज मेटे म्हणाले, ‘‘गेल्या ५ वर्षांपासून आम्ही ‘गाव तिथे हनुमानचालिसा’ हा उपक्रम चालू केला असून देवगिरी प्रांतात ७०० हून अधिक गावांत हा उपक्रम चालतो. ’’ लातूर येथील शिवयोग भवन मठाधिपती श्री श्री आदिनाथ स्वामीजी म्हणाले, ‘‘देव, देश, धर्म यांसाठी युवकांनी सतत कृतीशील रहाण्याचा संकल्प केला पाहिजे.’’

श्री श्री आदिनाथ स्वामीजी

स्वराज्य संघाचे अध्यक्ष प्रबोधनकार, कथाकार बाजीराव महाराज बांगर म्हणाले, ‘‘या निवडणुकीत वक्फ बोर्डाला कोट्यवधी रुपये देण्याची मागणी करण्यात आली होती. मुल्ला-मौलवी यांना १५ सहस्र रुपये वेतन देण्याची मागणी करण्यात आली होती. हे सर्व ‘फतवे’ हिंदूंनी मोडून काढले.’’ वीर देवस्थान येथील गुरव प्रसाद दळवीगुरुजी म्हणाले, ‘‘सद्यस्थितीत तरुण जागृत होत असतांना दिसतो; मात्र तो अजून जागृत झाला पाहिजे. येणारी पिढी धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी तिला धर्माचे आचरण शिकवावे लागेल.’’

अधिवेशनात घोषणात देतांना वारकरी, भाविक

ह.भ.प. रामकृष्ण महाराज लवीतकर म्हणाले, ‘‘सर्वधर्मसमभावामुळे परंपरेवर अनेक आघात झाले ! वैदिक धर्मात राजकारण्यांकडून फूट पाडण्याच प्रयत्न होत आहे ! अखंड हिंदूंचे संघटन करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागेल. हा देश सुरक्षित रहाण्यासाठी धर्माला मानणारे लोक राजकारणात असले पाहिजे. आज आळंदी आणि पंढरपूर येथील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. वारकरी संप्रदाय हा निम्म्या भारतात आहे. यापुढील काळात गोमातेला राष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे.’’

मुंबई येथील ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारींगे म्हणाले, ‘‘आपल्याला आतापर्यंत केवळ अन्न, वस्त्र, निवारा यांची आवश्यकता आहे, असे शिकवले गेले; मात्र त्याच समवेत चांगले संस्कार ही मानवी जीवनाची अत्यावश्यकता आहे, हे शिकवले गेले नाही. मानवी जीवनात सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे संस्कार होय आणि हे काम गेली ७५० वर्षे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून केले जात आहे ! परदेशात थंडीचे वातावरण असल्याने ‘टाय’ घालतात. भारतात मात्र लहान मुलांना इंग्रजी शाळेतही ‘टाय’ घालावा लागतो. त्याची आवश्यकता नाही.’’

कु. ईश्वरी पाटील

१० वर्षांच्या कु. ईश्वरी गजानन पाटील हिने सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या माध्यमातून धर्मशिक्षण घेण्याचे आवाहन केले. या अधिवेशनात मुंबई येथील ह.भ.प. विश्वनाथ महाराज वारींगे, ह.भ.प. रामकृष्ण महाराज लवीतकर, ह.भ.प. कारभारी अंभोरे महाराज यांसह अन्य मान्यवरांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर यांनी ‘लव्ह जिहाद’ची भयावहता सर्वांसमोर मांडली. विविध ठरावांचे वाचन करून पसायदानाने अधिवेशनाची सांगता झाली.

विशेष – हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज यांनी दिलेल्या घोषणांनी वारकर्‍यांमध्ये नवचैतन्य पसरले, तसेच ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चे विश्वस्त आणि कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर यांनी ‘भारत हिंदुस्थान है-हिंदूओ की शान है’, हे गीत सर्वांकडून गाऊन घेतले.

निरंजन शास्त्री कोठेकर आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा सत्कार !

या प्रसंगी ‘वारकरी शिक्षण संस्थे’चे माजी अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प. केशव महाराज उखळीकर, तसेच हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले यांनी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.

ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज (डावीकडून तिसरे) यांचा सत्कार करतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

सातत्याने धर्मकार्यासाठी देविदास धर्मशाळा उपलब्ध करून देणारे आणि धर्मकार्यात अग्रेसर असणारे ‘देविदास धर्मशाळे’चे अध्यक्ष ह.भ.प. निरंजन शास्त्री कोठेकर महाराज यांचा, तसेच वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांना दैनिक ‘सनातन प्रभात’मधील वृत्त, लेख या माध्यमातून सातत्याने वाचा फोडणारे, इंद्रायणी-चंद्रभागेच्या प्रदूषणाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अजय केळकर यांचा प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

उपस्थित मान्यवर

ह.भ.प. रामचंद्र महाराज पेनोरे, ‘सांस्कृतिक वार्तापत्रा’चे विश्वस्त आणि कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर, कोल्हापूर येथील ह.भ.प. मधुसूदन महाराज पाटील, ह.भ.प.जगन्नाथ महाराज मस्के, अच्युत महाराज दस्तापूरकर, ह.भ.प. मारुति महाराज तुंनतुने शास्त्री, ‘प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोट’चे पीठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे विश्वस्त ह.भ.प. प्रकाश महाराज जवंजाळ, ‘पालघर हिंदू शक्तीपीठा’चे हिंदूभूषण श्री. भारतानंद सरस्वती महाराज, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते डॉ. उदय धुरी, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे कार्याध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर.


क्षणचित्रे 

१. या अधिवेशनासाठी हडपसर येथून श्री. दत्तात्रय लक्ष्मण कुलकर्णी (वय ६७ वर्षे) आणि श्री. नारायण काशीद (७८ वर्षे) हे ४० किलोमीटर अंतर पार करून दुचाकीवरून आले होते.

२. प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांनी सर्वांकडून ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप करवून घेतला.

३. अधिवेशनस्थळी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांच्या प्रदर्शनास भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.


या प्रसंगी करण्यात आलेले विविध ठराव – ‘हरिद्वार’ आणि ‘ऋषिकेश’ या तीर्थक्षेत्रांच्या धर्तीवर श्रीक्षेत्र पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण आदी तीर्थक्षेत्रे यांसह राज्यातील सर्व मंदिरे, तीर्थक्षेत्रे यांचा परिसर १०० टक्के ‘मद्य-मांस मुक्त’ करण्यात यावीत, पंढरपूर येथील चंद्रभागा अन् आळंदी येथील इंद्रायणी नदीत सांडपाणी सोडण्यास बंदी घालावी, हिंदूंची भूमी-मंदिरे बळकावणारा ‘वक्फ’ कायदा रहित करावा, जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार कायक्रम अंमलबजावणी समितीच्या सहअध्यक्ष पदावरून शाम मानव यांची तात्काळ हकालपट्टी करावी, देशात समान नागरी कायदा आणि लोकसंख्या नियंत्रण कायदा करावा यांसह विविध ठराव या अधिवेशनात करण्यात आले.