पंडित सतीश शर्मा आणि स्वामी स्वात्मानंदजी यांची रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !

सनातन प्रभात चे कार्य जाणून घेतांना डावीकडून नविताजी, पंडित सतीश शर्मा आणि स्वामी स्वात्मानंदजी आणि त्यांना माहिती देतांना श्री. अभिषेक पै

सनातन आश्रम, रामनाथी (गोवा) – अमेरिकेत हिंदु धर्मप्रसाराचे कार्य करणारे स्वामी स्वात्मानंदजी, ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’चे अध्यक्ष असणारे इंग्लंड येथील पंडित सतीश शर्मा, तसेच त्यांच्यासमवेत कार्य करणार्‍या नविता यांनी २२ नोव्हेंबर या दिवशी सनातनच्या फोंडा, गोवा येथील आश्रमाला सदिच्छा भेट दिली. या वेळी सनातनचे साधक श्री. अभिषेक पै यांनी त्यांना आश्रमात चालणार्‍या राष्ट्र आणि हिंदु धर्म यांच्या प्रसाराच्या कार्याची ओळख करून दिली. सर्वांनी संपूर्ण कार्य आध्यात्मिक जिज्ञासेने जाणून घेतले.

१. आश्रमाच्या परिसरातील श्री भवानीदेवी मंदिरातील देवीची मूर्ती पहातांना, तसेच ध्यानमंदिरातील स्पंदने यांविषयी त्यांना विशेष अनुभूती आल्या.

२. ‘सनातन प्रभात’ कार्यालयातील माहिती फलकावर असलेले सनातन प्रभातचे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिहितांनाचे छायाचित्र पहातांना त्यांचा हात हालत आहे, अशी विशेष अनुभूती स्वामी स्वात्मानंदजी आणि पंडित सतीश शर्मा या दोघांना आली.

३. आश्रमातील साधक नामजप करत स्वयंपाक, तसेच धान्य निवडण्याची सेवा करतात, हा भाग त्यांना पुष्कळ भावला.

साधकांच्या चेहर्‍यावरील भाव अत्यंत आनंदी आणि समाधानी ! – स्वामी स्वात्मानंदजी

या वेळी स्वामी स्वात्मानंदजी म्हणाले की, मी अनेक ठिकाणी जातो. तेथील इमारती अत्यंत चांगल्या असतात; परंतु तेथील लोकांचे चेहरे, त्यांचे हावभाव यांच्या तुलनेत सनातन आश्रमातील साधकांचे चेहरे हे अत्यंत शांत, आनंदी आणि समाधानी होते. हे माझ्यासाठी सर्वांत प्रभावी होते.

धर्माचे मूळ स्वरूप राखून धर्मप्रसार करणार्‍या सनातन आश्रमाला सर्वांनी भेट द्यावी ! – पंडित सतीश शर्मा

या वेळी पंडित सतीश शर्मा म्हणाले की, आपण हिंदू ऐतिहासिक, तसेच भौगोलिक दृष्ट्या ‘विश्वगुरु’ म्हणून प्रसिद्ध आहोत. असे असले, तरी यात एक मोठे आव्हान हे आहे की, ज्ञान प्रसृत करणारी व्यक्ती अथवा संस्था अत्यंत शुद्ध आणि धर्माचे मूळ स्वरूप राखणारी असली पाहिजे. सनातन आश्रमाच्या रूपात मला धर्मज्ञान प्रसृत करणारे एक महत्त्वपूर्ण माध्यम मिळाले आहे.

येथील स्वच्छता आणि ज्ञान प्रसृत करण्याची त्यांची अफाट क्षमता यानेच मी प्रभावित झालो आहे, असे नाही; तर येथे चांगल्या मनाचे, नि:स्वार्थ रूपाने, तसेच भावाच्या स्तरावर कार्य करणारे लोक मी पाहिले, ज्यांचा ‘सर्वांचेच हित झाले पाहिजे’, हा उदात्त हेतू आहे. प्रत्येकाने सनातन आश्रमाला भेट दिली पाहिजे आणि आश्रमाचे कार्य वृद्धींगत होण्यासाठी त्यांना सर्व प्रकारे साहाय्य केले पाहिजे.

स्वामी स्वात्मानंदजी यांचा परिचय !

स्वामी स्वात्मानंदजी हे अमेरिकेत कार्यरत असून तेथे ते हिंदु धर्मप्रसाराचे कार्य करत आहेत. संयुक्त राष्ट्रांशी त्यांचा जवळचा संबंध असून ते हिंदु संतांच्या संघटनाचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.

पंडित सतीश शर्मा यांची संक्षिप्त ओळख !

पंडित सतीश शर्मा हे इंग्लंड येथे कार्यरत असून ते ‘ग्लोबल हिंदु फेडरेशन’ या संघटनेचे अध्यक्ष आहेत. ‘बीबीसी ऑन ट्रायल’ या माहितीपटाची निर्मिती त्यांनीच केली असून त्या माध्यमातून भारतभरात बीबीसीच्या विरुद्ध जनजागृती करण्याचे महत्त्वपूर्ण राष्ट्रकार्य ते करत आहेत.