(पॉवरग्रीड म्हणजे विद्युत पुरवठा करणारी उच्च दाबाची विद्युत यंत्रणा)
कीव – रशियाने १७ नोव्हेंबरला २०० हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोन यांच्या साहाय्याने युक्रेनमधील पॉवरग्रीडवर आक्रमण केले. या आक्रमणामुळे ऐन हिवाळ्यात युक्रेनमधील ३० लाखांहून अधिक नागरिकांना शून्य अंश तापमानाखाली अंधारात रहावे लागत आहे.
या आक्रमणाविषयी युक्रेनचे राष्टाध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की म्हणाले की, रशियाने युक्रेनमधील वीजेच्या अर्ध्याहून अधिक पायाभूत सुविधा नष्ट केल्या आहेत. यामुळे शेकडो युक्रेनियन नागरिकांनी घाबरून मेट्रो स्थानकांमध्ये बांधलेल्या छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे. आम्ही आमच्या पाश्चात्त्य सहयोगी देशांना पॉवरग्रीडच्या पुनर्बांधणीसाठी साहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.
रशिया-युक्रेन युद्धाला १९ नोव्हेंबरला १ सहस्र दिवस पूर्ण होणार !रशियाने युक्रेनवर २४ फेब्रुवारी २०२२ या दिवशी आक्रमण केले होते. त्यास युक्रेनतेही प्रत्युत्तर दिले. या युद्धाला १९ नोव्हेंबर २०२४ या दिवशी १ सहस्र दिवस पूर्ण होणार आहेत. १ सहस्र दिवस चालू असलेले हे युद्ध अद्यापही थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार या युद्धामध्ये किमान ११ सहस्र ७०० युक्रेनी नागरिक ठार झाले आहेत. |