मद्यावर गाणे न गाण्याविषयी तेलंगाणातील काँग्रेस सरकारने पाठवलेल्या नोटिसीला गायक दिलजीत दोसांझ यांचे प्रत्युत्तर
कर्णावती (गुजरात) – पंजाबी गायक आणि अभिनेते दिलजीत दोसांझ यांना तेलंगाणातील काँग्रेस सरकारने राज्यातील त्यांच्या कार्यक्रमात मद्याला प्रोत्साहन देणारी गाणे न गाण्याविषयी नोटीस बजावली आहे. या संदर्भात कर्णावती येथे झालेल्या त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी दोसांझ यांनी यावरून प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले की, एक मोहीम चालू करूया. आपल्या देशातील सर्व राज्ये ‘ड्राय स्टेट’ (दारूबंदी असणारे राज्य) घोषित होणार असतील, तर त्याच्या पुढल्याच दिवशी मी आयुष्यात कधीही दारुवर गाणे गाणार नाही. मी शपथ घेतो. पण असे खरेच होऊ शकते का ? कारण त्यातून फार कमाई होते. कोरोना काळात सर्व दुकाने बंदी होती; पण दारुची दुकाने चालू होती. जिथे जिथे माझे कार्यक्रम आहेत, तिथे तेवढे एक दिवस ‘ड्राय डे’ घोषित करा, मी दारुवर गाणे गाणार नाही.
दोसांझ पुढे म्हणाले की, मी अनेक भक्तीमय गाणी गायली आहेत. मागील १० दिवसांत मी २ भक्तीपर गीते गायली आहेत. एक भगवान शिव यांच्यावर आणि दुसरे गुरुनानक यांच्यावर; पण त्याविषयी कुणीच काही बोलत नाही. प्रत्येक जण टीव्हीवर बसून ‘पटियाला पेग’विषयीच (मद्य पिण्याचा एक प्रकार) बोलत आहे. ‘बॉलिवूड’मध्ये मद्यावर सहस्रो गाणी आहेत. माझी २ किंवा ४ गाणीच आहेत; पण मी आता ती गाणार नाही. माझ्यासाठी हे सोपे आहे; कारण मी स्वत: दारु पीत नाही. बॉलिवूड कलाकार दारुचे विज्ञापन करतात, मी करत नाही.
संपादकीय भूमिकाकुणीही सार्वजनिक स्थानावरून मद्याला प्रोत्साहन देऊ नये, असेच जनतेला वाटेल; मात्र तरीही देशातील जनता तंबाखु, मद्य आदी सेवन करते आणि त्यातून सरकारला अब्जावधी रुपयांचा महसूल मिळतो. जर सरकारला खरेच जनतेला अशा गोष्टींपासून दूर ठेवायची इच्छा असेल, तर यांवर बंदीच घालणे योग्य ठरील ! |