‘६.११.२०२४ या दिवशी हेमलता वाडेकर (वय ६८ वर्षे) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. १७.११.२०२४ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. साधकांना त्यांच्या निधनापूर्वी आणि निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. हसतमुख
‘वर्ष १९९९ ते २००७ या कालावधीत आम्ही मुंबई येथे रहात होतो. तेव्हा आमचा हेमलताताईंशी सेवेनिमित्त नेहमी संपर्क येत असे. हेमलताताई नेहमी हसतमुख असत.
२. हेमलताताई यांची शरीर प्रकृती काटक होती.
३. घरातील व्यक्तींशी जवळीक असणे
त्या परळ येथे एका बैठ्या घरात त्यांच्या भावाच्या समवेत रहात होत्या. त्या भावाच्या मुलांना शाळेत पोचवत असत. त्या वहिनीला घरकामात साहाय्य करत असत. त्यांचे त्यांच्या वहिनीशी सहसाधिकेप्रमाणे नाते होते.
४. सेवेची तळमळ
ताई घरातील कामे करून सेवेत अधिकाधिक सहभागी होत असत. त्या सत्संग घेणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, ग्रंथप्रदर्शन लावणे, विज्ञापने मिळवणे आणि प्रवचन करणे इत्यादी सेवा आनंदाने करत असत. माझ्याकडे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या छपाईच्या सेवेसाठी साधकांना पाठवण्याचे नियोजन होते. तेव्हा ताई तत्परतेने साधकांना संपर्क करून समन्वयाच्या सेवेमध्ये मला साहाय्य करत असत.
५. सहनशीलता
एकदा ताई दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्याच्या सेवेसाठी सिंधुदुर्ग येथे गेल्या होत्या. तेथे एका साधिकेच्या समवेत दुचाकी गाडीने जातांना त्यांचा अपघात झाला. त्या गाडीवरून पडल्याने त्यांना मार लागला आणि त्यांना रुग्णालयात भरती केले. त्यानंतर आम्ही त्यांना मुंबई येथे आमच्या घरी घेऊन आलो. एवढा मोठा अपघात होऊनही त्या आनंदी होत्या.
‘हेमलताताईंप्रमाणे मला आनंदी रहाता येऊ दे. त्यांना सद्गती मिळून त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ दे’, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते.’
– श्रीमती प्रज्ञा सखाराम कोरगावकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ७३ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१०.११.२०२४)
१. श्री. राहुल रामचंद्र पाटेकर, परळ, मुंबई.
१ अ. प्रेमभाव : ‘वर्ष २०१४ मध्ये आम्ही वडाळा, मुंबई येथून परळ येथे स्थलांतरित झाल्यावर आमचा सुश्री हेमलता वाडेकर यांच्याशी संपर्क आला. त्या आमच्याच परिसरामध्ये रहात होत्या. त्यामुळे त्यांच्याशी आमची जवळीक निर्माण झाली. त्या साधकांची प्रेमाने विचारपूस करायच्या.
१ आ. आधार देणे : माझे बाबा रुग्णाईत असतांना ताई आमच्या घरी आल्यावर माझ्या बाबांना नामस्मरण करण्यासाठी सांगत असत. बाबाही त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत. बाबा शेवटचे ६ मास रुग्णाईत असतांना ताई आमच्या कुटुंबियांना अधूनमधून भेट देऊन धीर देत. त्यामुळे आम्हाला त्यांचा आधार वाटत असे.
१ इ. साधकांना साधनेत साहाय्य करणे : ताई व्यष्टी साधनेचे प्रयत्न तळमळीने करत असत. त्यांनी मला नेहमीच व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या संदर्भात योग्य अन् आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन दिले. माझ्या मनात कधी नकारात्मक विचार आल्यास त्या मला सकारात्मक दृष्टीकोन देऊन त्या विचारातून बाहेर काढत असत. माझ्यासारख्या अनेक साधकांना ताईंनी योग्य दृष्टीकोन देऊन साधनेत साहाय्य केले.
१ ई. सेवेची तळमळ
१ ई १. शारीरिक त्रास असतांनाही उत्साहाने सेवा करणे : ताईंना शारीरिक त्रास असतांनाही त्या सत्संग घेणे, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, ग्रंथप्रदर्शनासाठी मंदिरांच्या विश्वस्तांना संपर्क करणे इत्यादी सेवा उत्साहाने करायच्या. ही सेवा करतांना त्यांनी मंदिरांच्या महिला विश्वस्तांशी जवळीक साधली होती.
१ ई २. वाचकांशी जवळीक साधणे : त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि जिज्ञासू यांना अतिशय प्रेमाने जोडून ठेवले होते. त्या वाचक आणि जिज्ञासू यांना संपर्क करून सनातनची उत्पादने, पंचांग, भेटसंच आणि ग्रंथ यांची माहिती द्यायच्या. त्यांनी अनेक वाचकांना साधक म्हणून घडवण्यासाठी प्रयत्न केले.
१ ई ३. रुग्णाईत असतांना भ्रमणभाषवरून सेवा करणे : हेमलताताईंना आधीपासून श्वसनाचा त्रास होता. मागील दीड वर्षांपासून त्यांना सतत प्राणवायू द्यावा लागत असे. त्यामुळे त्या बाहेर जाऊन सेवा करू शकत नव्हत्या. त्या घरी राहून भ्रमणभाषवरून सेवा करायच्या. त्यांना होणारा त्रास केवळ गुरुकृपेनेच त्या सहन करू शकल्या.
१ उ. भगवंताच्या अनुसंधानात असणे : ताई रुग्णाईत असतांनाही ‘भगवंताच्या अनुसंधानात असायच्या’, असे मला वाटते. त्या समाधानी आणि आनंदी होत्या. आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेल्यावर आम्हाला त्यांचे डोळे पाणीदार आणि तेजस्वी जाणवत होते.
१ ऊ. निधनाची पूर्वसूचना मिळणे : ६.११.२०२४ या दिवशी मला ताईंची आठवण येऊन रडू येऊ लागले. असे होण्यामागील कारण मला कळले नाही. मी त्यांच्या भाच्याला परात्पर गुरु डॉ. आठवले यांची ‘साधना’ या विषयावरील ध्वनीफित ताईंच्या जवळ लावून ठेवण्यासाठी पाठवली. त्यानंतर काही मिनिटांनी त्यांच्या भाच्याचा मला भ्रमणभाष आला आणि त्याने ‘ताईंचे निधन झाले आहे’, असे मला सांगितले. यावरून ‘देवानेच मला त्यांच्या निधनाची पूर्वसूचना दिली’, असे मला वाटले.
१ ए. निधनानंतर जाणवलेली सूत्रे
१. हेमलताताईंच्या मृत्यूनंतर मला त्यांचा चेहरा शांत आणि स्थिर वाटला. त्यांचे तोंड, हात आणि पाय पिवळसर जाणवले. त्यांचे हात लहान बाळासारखे मऊ लागत होते.
२. एरव्ही मला स्मशानात गेल्यावर दाब जाणवतो; पण या वेळी मला स्मशानात दाब न जाणवता शांत वाटत होते.
३. ‘ताईंचा लिंगदेह सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणांजवळ जात आहे’, असे मला जाणवले.’
सनातन संस्थेच्या कार्यात अनेक साधकांनी स्वतःला समिधारूपाने समर्पित केले आहे. हेमलताताई अशाच साधकांपैकी एक होत्या. ‘त्यांचा ९ वर्षांचा अनमोल सत्संग मला आणि माझ्या कुटुंबियांना लाभला’, त्याबद्दल आम्ही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहोत.’
२. श्रीमती रिमा पाटेकर, पनवेल
२ अ. आधार वाटणे : ‘मी हेमलताताईंना माझ्या कौटुंबिक आणि साधनेतील अडचणी सांगत असे. त्या वेळी त्या प्रत्येक अडचणीवर योग्य आध्यात्मिक दृष्टीकोन देत असत.
२ आ. साधक आणि जिज्ञासू यांच्याशी जवळीक साधणे : त्या जिज्ञासू आणि साधक यांच्याशी आपुलकीने बोलत असत. त्यानंतर त्या जिज्ञासूंना साधना सांगत असत. त्यांच्यातील प्रेमभावामुळे जिज्ञासू साधना चालू करत. त्या सर्वांना हव्याहव्याशा वाटणार्या होत्या. त्या केवळ साधकांशीच नव्हे, तर समाजातील व्यक्तींशीही प्रेमाने वागत असत. ‘साधक नसलेल्या लोकांनी साधना करावी’, असे वाटत असल्यास आधी त्यांच्याशी जवळीक साधायला हवी’, हे मला ताईंकडून शिकायला मिळाले.’
२ इ. वर्ष २०२३ मध्ये आम्ही मुंबईहून पनवेल येथे रहायला आलो. त्यामुळे माझी ताईंशी भेट होत नसे. त्या मला भ्रमणभाष करून देवद आश्रमात जाऊन सेवा करायला सांगत असत.
२ ई. मृत्यूची पूर्वसूचना मिळूनही आनंदी असणे : ताईंचे निधन होण्याच्या आदल्या दिवशी मी त्यांना भेटायला गेले होते. त्या वेळी त्या माझ्याकडे पाहून हसत होत्या. त्यांना पाहिल्यावर माझे अश्रू अनावर झाले. तेव्हा त्यांनी दोन्ही हातांनी माझे डोळे पुसले. ‘स्वतःचा मृत्यू जवळ आला आहे’, असे त्यांना जाणवत होते, तरीही त्या आनंदी होत्या.
३. सौ. नमिता दुखंडे (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६६ वर्षे), परळ, मुंबई.
३ अ. प्रकृती गंभीर असूनही सेवा करणे : ‘हेमलताताईंची फुफ्फुसे निकामी झाली होती. त्यांच्या रक्तामध्ये संसर्ग (इन्फेक्शन) झाल्यावर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी आणले. त्यांना घरी प्राणवायू द्यावा लागत असे. त्या रुग्णाईत असूनही ‘ऑनलाईन’ संपर्क सेवा करत असत. त्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त भ्रमणभाषवरून संपर्क करून अर्पण मिळवले.
३ आ. ‘परम पूज्य गुरुदेव’ असा नामजप करणे : मागील काही दिवसांपासून ताईंना श्वसनाचा त्रास चालू झाला होता. त्यांना बोलता येत नव्हते. तेव्हा त्या सतत ‘परम पूज्य गुरुदेव’ असे म्हणायच्या.’
४. सौ. मांडवी भरत बुगडे, नवीन पनवेल
४ अ. ‘हेमलताताईंचा मृत्यूनंतरचा आध्यात्मिक प्रवास आनंददायी असेल’, असे वाटणे : ‘पूर्वी हेमलताताई आणि मी एकत्र सेवा करत होतो. ताईंचे निधन झाल्याचे समजल्यावर माझ्या डोळ्यांपुढे त्यांचा आनंदी आणि हसतमुख चेहरा आला. ‘त्या मृत्यूनंतरही आनंदी आहेत आणि त्यांचा पुढील आध्यात्मिक प्रवासही आनंददायी असेल’, असा विचार माझ्या मनात आला.’
५. सुश्री (कु.) वत्सला रेवंडकर, परळ, मुंबई.
५ अ. हेमलताताईंचे अंत्यदर्शन घेतांना जाणवलेली सूत्रे
१. ‘हेमलताताई शांतपणे झोपल्या असून त्या गुरूंचा नामजप करत आहेत’, असे मला वाटले.
२. ‘गुरुदेवांनी त्यांना आजारपणातून सोडवले’, असे मला वाटले.
३. त्यांच्या अंत्यविधीच्या वेळी मला पुष्कळ शांतता जाणवली.’
६. श्री. कान्हा रेवंडकर, परळ, मुंबई.
अ. मृत्यूनंतर अनेक जणांचे देह निस्तेज दिसतात; मात्र ‘हेमलताताईंच्या चेहर्यावर तेज आहे’, असे मला जाणवले.’
(लेखातील सूत्रांचा दिनांक : ११.११.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |