ED Raids : झारखंड आणि बंगाल राज्यांत ‘इडी’च्या १७ ठिकाणी धाडी !

बांगलादेशी घुसखोरी, वेश्याव्यवसाय आणि पैशांची अफरातफर यांच्याशी संबंधित कारवाई !

रांची (झारखंड) – झारखंड आणि बंगाल या राज्यांतील १७ ठिकाणी अंमलबजावणी संचालनालयाने, म्हणजेच ‘ईडी’ने धाडी घातल्या. बांगलादेशी घुसखोरी, वेश्याव्यवसाय, तसेच विदेशातून पैशांची होणारी अफरातफर, या प्रकरणांशी संबंधित ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे मतदान १३ नोव्हेंबरला होत असल्याने आदल्याच दिवशी झालेल्या या कारवाईला अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. बंगालच्या विधानसभेच्या ६ जागांवरही पोटनिवडणुका होत आहेत.

१. जून २०२४ मध्ये रांची पोलिसांनी बरियाटू पोलीस ठाणे क्षेत्रातील बाली रिसॉर्टमधून ३ बांगलादेशी मुलींना वेश्याव्यवसायाशी संबंधित आरोपांवरून अटक केली होती. त्या बांगलादेशातील चट्टोग्राम येथील निवासी असल्याची माहितीही समोर आली होती.

२. या तिघींना न्यायालयाने प्रत्येकी १० सहस्र रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर जामीन संमत केला होता. ३ आठवड्यांपूर्वी ‘ईडी’चे अधिकारी या तिघींची चौकशी करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात गेले असता तेथील पोलीस अधिकार्‍याला या ३ मुलींची माहिती नसल्याचे समोर आले. (यातून बांगलादेशी घुसखोरीच्या प्रकरणात पोलिसांचे साटेलोटे असल्याची शक्यता दाट आहे, हेच म्हणता येईल. अशांविरुद्धही कठोर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक)