‘Hindu Jodo’ Yatra ! : भारतातील १६ राज्यांतून निघणार्‍या यात्रेत लाखो हिंदू सहभागी होणार ! – आदिनाथ संप्रदाय

सकल हिंदूंच्या संघटनासाठी आदिनाथ संप्रदाय काढणार ‘हिंदू जोडो’ यात्रा !

डावीकडून आशुतोष अहिर, महंत तानापतीस्वामी अनंत स्वरानंदगिरी महाराज, श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज (1) , डॉ. सरस्वती आनंद महाराज, मदन वाकडे, हिंदूराव जाधव

मुंबई, १२ नोव्हेंबर (वार्ता.) – भगवान शिवापासून निर्माण झालेल्या आणि प्राचीन काळापासून हिंदु धर्माच्या रक्षणासाठी कार्यरत आदिनाथ संप्रदायाकडून देशभरातील हिंदूंचे संघटन व्हावे, यासाठी ‘हिंदू जोडो’ यात्रा काढण्यात येणार आहे. १६ राज्यांमधून ११ सहस्र किलोमीटर इतका प्रवास करून ७१ दिवस ही पदयात्रा चालणार आहे. ९ जानेवारी २०२५ या दिवशी श्रीनगर (काश्मीर) येथील लाल चौकातून या यात्रेला प्रारंभ होणार असून कन्याकुमारीमधील रामेश्वर येथे यात्रेची सांगता होणार आहे. भारतासह जगभरातील सहस्रावधी साधू, संत, महंत आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसह लाखो हिंदु बंधू-भगिनी या यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती आदिनाथ संप्रदायाचे संस्थापक अध्यक्ष आणि पिठाधीश्वर श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज यांनी ११ नोव्हेंबर या दिवशी मुंबई येथे पत्रकार परिषदेत दिली. श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज यांच्या नेतृत्वाखाली देव, देश, धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी ही भव्य यात्रा काढण्यात येणार आहे.

‘हिंदू जोडो’ यात्रेमध्ये सहभाग घेण्यासाठी आवाहन करतांना संत, मान्यवर आणि कार्यकर्ते

या पत्रकार परिषदेला उज्जैन येथील खाटुशाम श्री महाकाल आखाड्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सरस्वती आनंद महाराज (उज्जैन), श्री पंचनाम जुना आखाड्याचे अध्यक्ष महंत तानापती स्वामी अनंत स्वरानंदगिरी महाराज, ‘हिंदू जोडो’ यात्रेचे मुंबई अध्यक्ष श्री. मदन वाकडे, ‘हिंदू जोडो’ यात्रेचे राष्ट्रीय महासचिव आशुतोष आहिर (उत्तरप्रदेश), ‘हिंदू जोडो’ यात्रेचे समन्वयक श्री. हिंदूराव जाधव, श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. मंगेश बंगे यांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

‘हिंदू जोडो’ यात्रेच्या जनजागृती यात्रेत सहस्रावधींच्या संख्येने सहभागी व्हा ! – श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज, संस्थापक अध्यक्ष, आदिनाथ संप्रदाय

श्री श्री २००८ महामंडळेश्वर कल्कीराम महाराज

हिंदु धर्म, संस्कृती आणि परंपरा यांच्या रक्षणासाठी हिंदू जोडो यात्रा काढण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १८ पगड जातींना संघटित करून हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. छत्रपती शिवरायांप्रमाणे हिंदुत्वाचा अंगीकार आम्हाला करायचा आहे. सद्यस्थितीत हिंदू विविध जातींमध्ये विभागले गेले आहेत. ‘हिंदू जोडो’ यात्रेद्वारे त्यांना संघटित करण्यात येणार आहे. देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठी यात्रा ठरेल.

‘भारत जोडो’ यात्रेतून विभाजित हिंदूंना संघटित केले जाणार ! – डॉ. सरस्वती आनंद महाराज, संस्थापक अध्यक्ष, खाटुशाम, श्री महाकाल आखाडा, उज्जैन

डॉ. सरस्वती आनंद महाराज

हिंदूंसह समस्त विश्वाच्या कल्यासाठी भारतामध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक आहे. बांगलादेशात हिंदू महिला-भगिनी यांच्यावर अत्याचार झाले आहेत. भारतातही ‘लव्ह जिहाद’च्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहे. त्यामुळे पदयात्रेद्वारे हिंदूंना संघटित करण्याचे कार्य हिंदू जोडो यात्रेतून होणार आहे.

‘हिंदू जोडो’ यात्रेतून हिंदूसंघटन दाखवा ! – महंत तानापतीस्वामी अनंत स्वरानंदगिरी महाराज, अध्यक्ष, श्रीपंचनाम जुना आखाडा

महंत तानापतीस्वामी अनंत स्वरानंदगिरी महाराज

अनेक फुले एकत्र करून गुच्छ केला, तर तो सुंदर दिसतो. या गुच्छाप्रमाणे हिंदूंनी एकत्र येऊन कार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदुत्व हाच विविध जातीमधील हिंदूंना जोडणारा समान धागा आहे. ‘हिंदू जोडो’ यात्रेद्वारे हिंदूंचे संघटित होणे आणि दाखवणे आवश्यक आहे.

कुलस्वामिनी तुळजाभवानीदेवीच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात जनजागृती !

१३ नोव्हेंबर या दिवशी कुलस्वामिनी देवी तुळजाभवानीचा आशीर्वाद घेऊन ‘भारत जोडो’ यात्रेच्या जनजागृतीला महाराष्ट्रात प्रारंभ करण्यात येणार आहे. जनजागृतीसाठी मुंबई, कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आिण नागपूर असे ७ विभागांत वर्गीकरण करण्यात आले आहे. जनजागृतीसाठी महाराष्ट्रात पदयात्रा काढण्यात येणार आहे. नाशिक येथे जनजागृती यात्रेची सांगता होणार आहे.

महाराष्ट्रातील ५० सहस्र हिंदूंच्या सहभागाचे नियोजन !

‘हिंदू जोडो’ यात्रेत महाराष्ट्रातील हिंदूंना सहभागी होता यावे, यासाठी रेल्वेचे आरक्षण केले जाणार आहे. महाराष्ट्रातून ५० सहस्र जण हिंदू जोडो यात्रेत सहभागी होतील, असे ध्येय ठेवण्यात आले आहे. यात्रेत सहभागी होणार्‍यांना विनामूल्य भोजन आणि निवास यांची व्यवस्था केली जाणार आहे.

हिंदूंनी एकत्र येऊन अधर्मरूपी कचरा स्वच्छ करावा ! – आशुतोष अहिर, राष्ट्रीय महासचिव, हिंदू जोडो यात्रा (उत्तरप्रदेश)

देश आणि धर्म यांसाठी हिंदूंना एकत्र यावे लागेल. काड्या सर्वत्र पसरवल्या, तर त्याचा कचरा होतो; परंतु त्या एकत्र करून त्यांची झाडू केली, तर ती कचरा स्वच्छ करते. अशा प्रकारे देशातील अधर्मीरूपी कचरा स्वच्छ करण्यासाठी हिंदूंनी एकत्र येणे आवश्यक आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येक गावात जनजागृती करणार ! – हिंदूराव यादव, महाराष्ट्र समन्वयक, हिंदू जोडो यात्रा

छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदुत्व धारण करणे हिंदूंची आवश्यकता आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून हे हिंदुत्वाचे विचार हिंदूंपर्यंत पोचवणार आहोत. महाराष्ट्रातील प्रत्येक गावामध्ये जनजागृती करून हिंदू जोडो यात्रेत आम्ही हिंदूंना सहभागी करून घेणार आहोत.

हिंदूच्या जनजागृतीचा जागर करणार ! – मदन वाकडे, मुंबई अध्यक्ष, हिंदू जोडो यात्रा

हिंदू जोडो यात्रेच्या जनजागृतीसाठी आम्ही प्रथम श्री सिद्धिविनायकाचे आशीर्वाद घेतले आहेत. या यात्रेच्या माध्यमातून हिंदूंच्या जनजागृतीचा जागर करू.


असे असेल ‘हिंदू जोडो’ यात्रेचे स्वरूप !

भारत जोडो यात्रेच्या अग्रस्थानी रथ असणार आहे. या यात्रेत विविध संप्रदायांचे संत-मंडत सहभागी होणार आहेत. एका व्यक्तीने ३ दिवस या यात्रेत सहभागी व्हावे, असे नियोजन करण्यात आले आहे. नियमित किमान ५ सहस्र जण यात्रेत सहभागी असतील. रात्रीच्या वेळी निवास करून पहाटे लवकर यात्रेला प्रारंभ होईल. ढोल, डमरू, लेझीम या पारंपरिक वाद्यांच्या नादाने श्रीनगर येथून यात्रेला प्रारंभ होईल. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायासह देशातील विविध संस्कृतींचे देखावे या यात्रेत असणार आहेत. रूद्राक्षांच्या शिवलिंगाचे विधीवत् पूजन करून यात्रेला प्रारंभ होईल.


अशी करणार यात्रा मार्गक्रमण !


श्रीनगर लाल चौक (काश्मीर) येथून प्रारंभ – हिमाचल प्रदेश- उत्तराखंड – देहली – उत्तर प्रदेश – मध्य प्रदेश – राजस्थान – गुजरात – महाराष्ट्र – तेलंगाणा – कर्नाटक – आंधप्रदेश – तमिळनाडू – केरळ – कन्याकुमारी येथील रामेश्वर येथे सांगता.

प्रांतवाद, जातीभेद बाजूला सारून हिंदूंना एकत्र करणे हा ‘हिंदू जोडो’ यात्रेचा उद्देश आहे. त्यामुळे समस्त हिंदू बांधवांनी या यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री श्री २००८ महामंडलेश्वर कल्कीराम महाराज यांनी केले आहे.