इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदौर’च्या वतीने आयोजित प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोप सोहळा ९ आणि १० नोव्हेंबर २०२४ या दिवशी येथील नवनीत गार्डन सभागृहात भावपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला ट्रस्टचे अध्यक्ष श्री. शरद बापट, अन्य पदाधिकारी, तसेच डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांच्यासह अनेक भक्त उपस्थित होते. सनातन संस्थेचे प्रेरणास्थान असणारे प.पू. श्रीमद् सद्गुरु रामानंद महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सव २६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा करण्यात आला.
समारोपाच्या शेवटच्या दिवशी प.पू. महमंडलेश्वर दादू महाराज, प.पू. विष्णुगिरी महाराज आणि प.पू. प्रविणनाथ महाराज या संतांची वंदनीय उपस्थिती होती. त्यांनी उपस्थितांना ‘आपले गुरूच सर्वश्रष्ठ असून त्यांना कधीही सोडू नये’, असे मार्गदर्शन केले.
प.पू. रामानंद महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या अंतर्गत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या १३ अक्षरी मंत्राचा जप ज्या भक्तांनी अधिक लिहिला, त्यांचे न्यासाकडून या वेळी कौतुक करण्यात आले. त्यातील सुंदर अक्षर असणार्या ३ भक्तांचे अभिनंदन अन् कौतुक करण्यात आले.
अनेक संस्थांसह सनातन संस्थेचाही सत्कार
विविध संस्थांचाही या वेळी सत्कार करण्यात आला. यात सनातन संस्थेचाही सत्कार करण्यात आला. हा सत्कार डॉ. (सौ.) कुंदा आठवले यांनी स्वीकारला.