महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या १ सहस्र ४४४ उमेदवारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद !

मुंबई – महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसाठी ४ सहस्र १४० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांतील १ सहस्र ४४४ उमेदवारांविरुद्ध विविध गुन्ह्यांची नोंद आहे. उमेदवारी अर्ज भरतांना उमेदवारांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये स्वत:ची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी घोषित करणे बंधनकारक आहे. याविषयी निवडणूक आयोगाला दिलेल्या माहितीमध्ये उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी स्पष्ट करण्यात आली आहे.

निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या काही उमेदवारांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे, तर काहींविरुद्ध किरकोळ स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. काही उमेदवारांविरुद्ध राजकीय गुन्हे आहेत. काही उमेदवारांविरुद्ध आंदोलन करतांना नोंदवण्यात आलेले गुन्हे आहेत. या सूचीमध्ये यापूर्वी मंत्री, आमदार असलेल्या उमेदवारांचाही समावेश आहे. गुन्हे नोंद असलेल्या उमेदवारांमध्ये स्त्रियांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. निवडणूक आयोगाच्या ‘केवायसी’ अ‍ॅपवर उमेदवारांवर नोंद असलेल्या गुन्ह्यांचा तपशील देण्यात आला आहे.