पाश्चात्त्य विकृतीला भुललेल्या हिंदु महिलांनो, धर्माचरण करा आणि आपल्या मुलींनाही ते करण्यास शिकवा !

प्रतीकात्मक छायाचित्र

 १ . पाश्चात्त्य विकृतीच्या प्रभावामुळे हिंदु स्त्रियांच्या वेशभूषेत टप्प्याटप्प्याने पालट होणे

‘पोर्तुगिजांच्या आक्रमणापूर्वी गोव्यातील लहान हिंदु मुली परकर-पोलके घालत असत. किशोरावस्थेत (किंवा युवावस्थेत) त्या नऊवारी साडी नेसायला आरंभ करत. साधारण १९५०च्या दशकात स्त्रियांचा पेहराव पालटत गेला. लहान मुली परकर-पोलक्याऐवजी ‘फ्रॉक’ घालू लागल्या. लग्नानंतर नऊवारी साडी नेसणार्‍या स्त्रिया सोयीची ठरणारी सहावारी साडी नेसू लागल्या. महिला शिक्षित झाल्यावर त्या नोकरी करू लागल्या. साधारण १९७०च्या दशकातील महिला साडीऐवजी पंजाबी पोषाख घालू लागल्या. अलीकडच्या काळात पाश्चात्त्य पोषाखांना भुललेल्या स्त्रियांनी तर साडी नेसणेच सोडून दिले आहे. त्या केवळ लग्नात किंवा धार्मिक कृती करतांना साडी नेसतात, तेसुद्धा घरातील वडीलधारी मंडळींना बरे वाटावे म्हणून ! मंदिरात देवाच्या दर्शनाला जातांनाही त्या साडी नेसत नाहीत. ‘स्वतःच्या आरोग्यासाठी, तसेच आध्यात्मिकदृष्ट्या साडी नेसणे किती लाभदायक आहे’, हे त्यांनी कधी समजूनच घेतले नाही.

अशीच स्थिती आपल्याला जवळजवळ संपूर्ण भारतभर पहायला मिळते, अगदी दूर-दूरच्या गावांमध्येसुद्धा ! पाश्चात्त्य पोषाख परिधान करण्याचा महिलांचा छंद एवढा वाढला आहे की, एखादी स्त्री जर भारतीय वेशभूषेत असेल, तर ‘मागासलेपणा’ किंवा ‘जुनाट’ या भावनेने तिला दुर्लक्षित केले जाते आणि तिच्याकडे उपहासात्मक दृष्टीने पाहिले जाते.

१९८०च्या दशकापर्यंत राष्ट्रीय दूरचित्रवाणी असलेल्या ‘दूरदर्शन’वरील स्त्रियांचा अधिकृत पेहराव ‘साडी’ हाच असायचा. त्यानंतर हळूहळू त्या ‘सूट (कोट)’ आणि ‘पँट (पायघोळ)’ घालू लागल्या. आता तर केवळ दीपावलीसारख्या सणांनाच त्या भारतीय वेशभूषेत दिसतात.

सध्या ‘मॉल’सारख्या (मोठे व्यापारी संकुल) ठिकाणी स्वच्छतेचे काम करणारे किंवा तेथील इतर कामगार यांचा गणवेशही भारतीय पद्धतीनुसार नसतो. त्यांना बळजोरीने ‘शर्ट-पँट’ हाच गणवेश घालावा लागतो. रुग्णालयातील परिचारिकांनाही कामावर (सेवेत) असतांना तोकडे कपडे घालावे लागतात. ही संस्कृती पालटण्याची आवश्यकता आहे. काही ठिकाणी आपल्याला पांढर्‍या, हलक्या निळ्या किंवा राखाडी रंगाच्या साडी नेसलेल्या परिचारिका दिसतात.

२. पूर्वीच्या आणि अलीकडच्या काळात प्रत्येक विज्ञापनातील आईच्या वेशभूषेत होत असलेला पालट

डॉ. रूपाली भाटकार

प्रसारमाध्यमे हे समाजमनाला प्रभावित करणारे आणखी एक माध्यम आहे. मी जेव्हा लहान होते, तेव्हा मला आठवते की, १९७० आणि १९८०च्या दशकात चित्रपट किंवा दूरचित्रवाणी यांतील कार्यक्रमांमध्ये आईची भूमिका साकारणारी स्त्री ही नेहमी साडीमध्येच दाखवली जायची. मंगळसूत्र, कर्णफुले, बांगड्या आणि ठसठशीत कुंकू, केसांचा छानसा अंबाडा असा तिचा पेहराव असायचा. ती मनाला भावणारी एक अस्सल भारतीय स्त्री असायची; पण सध्याच्या प्रत्येक विज्ञापनात आईला पाश्चात्त्य पेहरावात, केस मोकळे सोडलेली, विनादागिने आणि विनाकुंकू दाखवलेली असते. सनातन हिंदु धर्माने धर्माचरणाचे काही नियम घालून दिले आहेत, ते योग्य आणि शास्त्राला धरून आहेत, उदा. मोकळे आणि लांब केस वातावरणातील अनिष्ट (नकारात्मक) शक्ती आकर्षित करून घेतात. त्यामुळे डोक्यावरून अंघोळ करणे किंवा पतीसमवेत खोलीत असणे यांव्यतिरिक्त अन्य वेळी स्त्रीने केस मोकळे सोडायचे नसतात; मात्र प्रसारमाध्यमे त्यांच्या पाश्चात्त्य व्यावसायिक भागीदारांच्या संस्कृतीने प्रभावित झालेली असल्यामुळे ती हिंदु दर्शकांना अधोगतीला नेत आहेत.

३. हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रींच्या वेशभूषेकडे तरुण स्त्रिया आदर्श म्हणून पहातात. त्यामुळे ‘बॉलीवूड (हिंदी चित्रपटसृष्टी)’ हेसुद्धा या स्त्रियांच्या वेशभूषेवर परिणाम करणारे एक प्रभावी माध्यम आहे.

४. मंगळसूत्राचा अर्थ आणि आध्यात्मिक महत्त्व जाणून न घेता अलीकडच्या विधवांनी ते घालणे

गळ्यात ‘मंगळसूत्र’ घालण्याविषयीही अलीकडच्या हिंदु स्त्रियांमध्ये विपर्यस्त मानसिकता दिसून येते. प्रत्यक्षात ‘मंगळ’ याचा अर्थ ‘मंगलमय’ किंवा ‘शुभ’ असून ‘सूत्र’चा अर्थ ‘धागा’ असा आहे. याचाच अर्थ ‘मंगळसूत्र’ हा दोन आत्म्यांना जोडणारा एक धागा अन् दागिना आहे. मंगळसूत्रातील काळ्या मण्यांच्या दोन माळा या विवाहबद्ध झालेल्या दोन जिवांचे प्रतीक आहे, तर त्यांना जोडणारा सोन्याचा ‘मुहुर्तमणी’ किंवा दोन वाट्या हे सांसारिक जीवनाचे प्रतीक आहे. विवाहित स्त्री (सवाष्ण) ही प्रकट शक्तीचे रूप असते. त्यामुळे तिच्यावर नकारात्मक (अनिष्ट) शक्तींची आक्रमणे होण्याचा धोका असतो. मंगळसूत्रातील काळे मणी ही नकारात्मक शक्ती खेचून घेत असल्यामुळे तिचे त्यापासून अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण होते.

तीच्या निधनानंतर विधवेने तिचे जीवन देवाच्या अनुसंधानात व्यतित करायचे असते; म्हणूनच तिला ‘श्रीमती’ असे संबोधले जाते; अर्थात् ‘श्री’ म्हणजे देव आणि ‘मती’ म्हणजे मन’, असे म्हटले जाते. पतीच्या निधनानंतर तिचे प्रयत्न देवाशी एकरूप होण्याच्या दिशेने असायला हवेत. वास्तविक हाच मनुष्यजन्माचा उद्देश आहे. पतीच्या निधनानंतर विधवा ही अप्रकट शक्तीचे रूप झाल्याने तिच्यावर अनिष्ट शक्तींची आक्रमणे होण्याची शक्यता अल्प असते. या कारणास्तव तिने मंगळसूत्र घालायचे नसते. पतीच्या निधनानंतरही विधवेने मंगळसूत्र काढले नाही, तर ‘अजूनही मी तिचा पती आहे’, असे वाटून तिच्या पतीचा आत्मा परत तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. त्याला मुक्तीच मिळत नाही. हे शास्त्र समजून न घेतल्यामुळे अलीकडच्या विधवा पतीच्या निधनानंतरही मंगळसूत्र काढत नाहीत. ‘पती जिवंत असतांना मंगळसूत्र घालत होते, तर आता का नको ?’, असा वाद काही स्त्री-स्वातंत्र्यवादी करतात. ‘इतर पुरुषांच्या वाईट नजरेपासून रक्षण होण्यासाठी मंगळसूत्र घालते’, असे कारण काही विधवा पुढे करतात; कारण काहीही असो, विधवेने मंगळसूत्र घालणे, हे आध्यात्मिकदृष्ट्या अयोग्यच आहे.

५. नवविवाहित स्त्रियांनी नाममात्र म्हणून नवीन पद्धतीचे मंगळसूत्र घालणे

अलीकडच्या नवविवाहित स्त्रिया गळ्यात मंगळसूत्रच घालत नाहीत. ‘पाश्चात्त्य वेशभूषेवर ते चांगले दिसत नाही’, असे त्यांना वाटते. लोक आपल्याला ‘जुनाट किंवा पुराणमतवादी म्हणतील’, या भीतीने मंगळसूत्र घातले जात नाही. काही स्त्रिया नाममात्र म्हणून नवीन पद्धतीचे मंगळसूत्र घालतात. हे मंगळसूत्र म्हणजे लहान आकारातील आणि तुरळक संख्येतील काळे मणी असलेली बारीक सोन्याची साखळी ! अनेक सोनारांकडे अशा प्रकारची नवनवीन मंगळसूत्रे उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे पारंपरिक मंगळसूत्रासारखी दिसणारी खोटी मंगळसूत्रेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत; मात्र यामध्ये पारंपरिक काळ्या मण्यांऐवजी एक आड एक किंवा सलग सोन्याचे मणी असतात, तर वाट्यांच्या जागी सोन्याचे पदक असते. पारंपरिक मंगळसूत्राप्रमाणे दिसू नये, यासाठी काही मंगळसूत्रे सोन्याच्या साखळीने बनवलेली असतात. काही श्रीमंत स्त्रिया त्यांची श्रीमंती दर्शवण्यासाठी ६ पदरी मंगळसूत्र घालतात. आध्यात्मिकदृष्ट्या हे चुकीचे आहे. ‘मंगळसूत्रातील काळ्या मण्यांच्या २ माळा या विवाहबद्ध झालेल्या दोन जिवांचे प्रतीक आहे’, असे आपण यापूर्वी म्हटले आहे. ६ पदरी मंगळसूत्राचा अर्थ ‘त्या स्त्रीचा विवाह ५ पुरुषांशी झाला’, असा तर होत नाही ना ?

६. धर्मशिक्षणाच्या अभावी आधुनिक हिंदु विवाहित स्त्रियांनी कुंकू न लावणे, तर हिंदु विधवांनी कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे

कपाळावर कुंकू लावण्यासंदर्भातही असेच चित्र दिसून येते. पूर्वीच्या काळी विवाहित स्त्रिया आपल्या कपाळावर कुंकू लावत. हे कुंकू हळद आणि चुना यांनी बनलेले असायचे. कपाळावर कुंकू लावल्याने त्या ठिकाणी असलेले आज्ञाचक्र जागृत होते. नंतरच्या काळात तरल (द्रव) स्वरूपातील कुंकू, म्हणजेच ‘गंध’ वापरात येऊ लागले. हे गंध प्लास्टिकच्या काडीच्या साहाय्याने कपाळावर लावले जायचे. त्यानंतरचा काळ आला वापरायला अत्यंत सोयीस्कर असलेल्या टिकल्यांचा ! स्त्रिया त्यांच्या कपड्यांच्या रंगांनुसार विविध रंगांच्या (आणि विविध आकारातील) टिकल्या लावू लागल्या. आता तर कपाळावर काहीच लावले जात नाही.

काय विरोधाभास आहे पहा ! हिंदु विधवा स्वतःच्या कपाळावर कुंकू किंवा टिकली लावतात, तर विवाहित स्त्री स्वतःच्या कपाळावर काहीच लावत नाही. स्त्री-स्वातंत्र्याच्या हव्यासापायी विधवा स्त्रीला वाटते, ‘धर्मशास्त्रानुसार वागण्याची आवश्यकता नाही. मला माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याचा अधिकार आहे.’ त्यामुळे ती बिनधास्तपणे स्वतःच्या कपाळावर कुंकू लावते, तर विवाहित स्त्री स्वतःला आधुनिक असल्याचे दर्शवण्यासाठी कपाळावर कुंकू लावत नाही.

७. दूरचित्रवाणीवरील अभिनेत्रींचा आदर्श ठेवून स्त्रियांनी केस मोकळे सोडणे

अलीकडच्या स्त्रियांचे आणखी एक विपर्यस्त वागणे म्हणजे केस मोकळे सोडणे ! स्वतःचे केस सरळ करण्यासाठी आताच्या स्त्रिया सहस्रो रुपये व्यय करतात. केस कमरेपर्यंत लांब असले, तरी ते मोकळे सोडले जातात. याचे मुख्य कारण, म्हणजे दूरचित्रवाणीवरील बहुतांश अभिनेत्रींना केस मोकळे सोडलेले दाखवतात. या अभिनेत्री तरुणवर्गातील महिलांचा आदर्श असल्यामुळे त्याही त्या अभिनेत्रींचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात.

८. सनातन हिंदु धर्माने महिलांना दिलेल्या उच्च स्थानाविषयी महिलांनी देवाप्रती कृतज्ञ असायला हवे ! 

सनातन हिंदु धर्माने महिलांना नेहमीच उच्च स्थान दिले आहे, हे महिलांनी सदैव लक्षात ठेवायला हवे. तिला समाजामध्ये आई, बहीण आणि पत्नी म्हणून आदराचे स्थान दिले गेले आहे. त्यामुळे या कृतींचा आध्यात्मिकदृष्ट्या काय परिणाम होतो, याचा गंधही नसलेल्या स्त्री-स्वातंत्र्यवाद्यांना फसण्याची आताच्या महिलांना काहीच आवश्यकता नाही. माझ्या अल्प ज्ञानानुसार जगभरातील इतर कोणताही धर्म / पंथ महिलांना एवढा आदर देत नाही; परंतु स्त्री-स्वातंत्र्यवाले हिंदु धर्माची अपकीर्ती करण्यासाठी ‘महिलांना दुय्यम स्थान दिले जाते’, असा अपप्रचार करून त्याला विरोध करतात. प्रत्यक्षात हिंदु धर्माने स्त्रीला शक्ती किंवा देवी अशा स्वरूपाचे स्थान दिले असून रामकृष्ण परमहंस यांच्यासारख्या संतांनीही तिची उपासना केली आहे. ‘ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिदेवांचा जन्मसुद्धा जगन्माता भगवतीदेवीपासून झाला आहे’, असा हिंदु धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे. त्यामुळे हिंदु स्त्रियांनी धर्माचरणाला विरोध न करता त्याविषयी चिंतन करणे आवश्यक आहे. स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी धर्माचरणाचे हे नियम पूरक ठरतात. हिंदु धर्माने हे नियम घालून दिल्यासाठी सनातन हिंदु धर्म आणि देव यांविषयी प्रत्येक स्त्रीने कृतज्ञ असायला हवे.

मी सर्व हिंदु महिलांना आवाहन करते की, त्यांनी स्त्री-स्वातंत्र्यवाद्यांच्या भूलथापांना न फसता भारतीय वेशभूषेकडे वळावे आणि आपल्या मुलींनाही तसे करण्यास शिकवावे. असे केले, तरच हिंदु राष्ट्र आणि भारतमाता यांचे गतवैभव पुनर्स्थापित करणे शक्य होईल.’

– डॉ. रूपाली भाटकार, फोंडा, गोवा.